शेतकऱ्याच्या मुलाचा पी.एच.डी. पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! प्राचार्य डॉ. दुर्योधन विठ्ठल पाटील यांचा भव्य सत्कार

माळशिरस (बारामती झटका)
शेतीत राबणाऱ्या कुटुंबात जन्म घेऊन, अनेक संकटांवर मात करत पी.एच.डी. पर्यंत मजल मारणारे प्राचार्य डॉ. दुर्योधन विठ्ठल पाटील यांचा पी.एच.डी. सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. शेतकऱ्याचा मुलगा ते प्राचार्य आणि डॉक्टर (पी. एच. डी.धारक), असा त्यांचा प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

संघर्षातून उभा राहिलेला नेता
डॉ. दुर्योधन विठ्ठल पाटील यांचे वडील कै. विठ्ठल साहेबराव पाटील हे अवघे ३ री पर्यंत शिकलेले शेतकरी होते. आई श्रीमती लक्ष्मी विठ्ठल पाटील या निरक्षर होत्या. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही त्यांनी मुलाच्या शिक्षणाला कधीही अडथळा येऊ दिला नाही.
लहानपणापासून दुर्योधन विठ्ठल पाटील यांनी आई-वडिलांना शेतीकामात मदत केली. वडिलांसोबत मळणी मशीन चालवणे, उन्हाळी सुट्टीत यारी /क्रेन चालवणे (विहीर खोदणे), गाय सांभाळणे असे कष्टाचे काम करत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळत त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. “वडील असते तर त्यांना खूपच आनंद झाला असता,” अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
शिक्षणाचा प्रदीर्घ प्रवास
- इयत्ता १ ली ते ७वी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटील वस्ती(फडतरी )
- इयत्ता ८वी ते १० वी – माध्यमिक विद्यालय, लोंढे मोहितेवाडी
- ११ वी व १२ वी – डॉ. बा. ज. दाते प्रशाला नातेपुते
- बी. ए.- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते.
- एम.ए. (भूगोल) – शाहू कॉलेज, लातूर
- बी.एड. – आर. सी. पटेल शिक्षणशास्त्र विद्यालय, शिरपूर, जि. धुळे – प्रथम श्रेणीत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण
- एम.फिल. – शाहू कॉलेज, लातूर
- पी.एच.डी. – स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड
- मार्गदर्शक – डॉ. सदानंद मोरे

याशिवाय त्यांनी एम.ए. भूगोल, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, मराठी या विषयांमध्येही शिक्षण घेतले आहे. तसेच त्यांचा पत्रकारितेचा ही कोर्स केला आहे.
सध्याची जबाबदारी
डॉ. दुर्योधन विठ्ठल पाटील हे सध्या श्री. महालक्ष्मी विद्यालय व महाविद्यालय, मोही येथे प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी ग्रामपंचायत फडतरी सरपंच म्हणूनही काम केले आहे. तसेच विविध सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था आणि सामाजिक संघटनांमध्ये ते सक्रिय आहेत. तसेच त्यांचा सर्वात मोठा व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय असून सध्या त्यांच्याकडे 30 गाईंचा गोठा आहे.

कौटुंबिक परिचय
आई श्रीमती लक्ष्मी विठ्ठल पाटील, पत्नी सौ. सुगंधा विठ्ठल पाटील या प्राथमिक शिक्षिका आहेत. मुलगा सार्थक पाटील, मुलगी स्वराली पाटील. बंधू राजेंद्र पाटील, वहिनी पूनम पाटील आणि बहीण मनिषा मेटकरी (प्राथमिक शिक्षिका) यांनी या प्रवासात त्यांना कायम साथ दिली.

सत्कार सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
या सत्कार सोहळ्याला श्री. बिलवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. बाबुराव देवकर सर, सचिव प्रा. पोपटराव देवकर सर, मा. अध्यक्ष रामचंद्र देवकर, मा. सचिव हनुमंतराव देवकर, जि. प. शाळा बागवस्तीचे मुख्याध्यापक होडगे सर, माळशिरस पंचायत समितीचे उपसभापती किशोर भैय्या सूळ, प्रा. डी. एस. थोरात, प्रा. संग्राम नीटवे सर, प्रा. राजेंद्र खिल्लारे, प्रा. प्रमोद गायकवाड, सुभाष पाटील, राजेंद्र पाटील, एच. टी. वाघमोडे यांच्यासह श्री बिलवेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, मोहीचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याशिवाय त्यांचा वैयक्तिक वेगवेगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सन्मान केला जात आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. डी. व्ही. पाटील म्हणाले, “इतका मोठा व्याप असताना असताना पी. एच. डी. करणे सोपे नव्हते. अनेक संकटांवर मात करून मी इथपर्यंत पोहोचलो. हा सत्कार माझा नसून माझ्या आई-वडिलांच्या कष्टाचा आणि माझ्या गुरूंच्या मार्गदर्शनाचा आहे.”

शेतकऱ्याच्या मुलाने जिद्दीच्या जोरावर मिळवलेले हे यश ग्रामीण भागातील अनेक तरुणांसाठी दीपस्तंभ ठरणार आहे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



