आ. बबनदादा शिंदे यांचे पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन

माढा (बारामती झटका)
माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनदादा शिंदे यांनी वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन दिलेले आहे.
सदर निवेदनामध्ये असे नमूद करण्यात आले आहे की, माढा विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. २२/५/२०२४ रोजी व दि. ४/६/२०२४ रोजी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे माढा, पंढरपूर व माळशिरस या तालुक्यात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये शेतातील केळी, डाळिंब, द्राक्षे, पेरू, लिंबू, पपई, आंबा या फळबागा जमीनदोस्त झाल्याने प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ पडल्याने शेतकऱ्यांनी केळी, डाळिंबाच्या बहुतांशी बागा जतन ठेवल्या होत्या. सदरील फळबागा या उतरण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी शिल्लक होता. परंतु, वादळी वाऱ्यामुळे केळी, डाळिंब, पपई या बागा जमीनदोस्त झाल्याने हातातोंडाला आलेला घास वादळी वाऱ्यामुळे हिरावल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे.

त्याचबरोबर वादळी वाऱ्यामुळे विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला. तसेच घरावरील पत्रे उडून गेल्याने संसार उघड्यावर आला आहे.
तरी, वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई मंजूर करण्याबाबत संबंधितांना आदेश देण्याची विनंती, या निवेदनामध्ये करण्यात आली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.