बारामती येथे तीन दिवसीय ‘बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन’ कार्यशाळा संपन्न

बारामती (बारामती झटका)
राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तीन दिवसीय ‘बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन’ कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.
या कार्यशाळेत वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक व डॉक्टरांच्या अध्यापन कौशल्याचा विकास करणे आणि नवीन योग्यता-आधारित वैद्यकीय प्रणाली प्रभावीपणे लागू करण्याविषयी माहिती देण्यात आली.
विद्यार्थ्यांना वैद्यकीय विषयांचे सुलभ व प्रभावी पद्धतीने आकलन व्हावे यासाठी विविध शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर, विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक व सैद्धांतिक जानाचे योग्य मूल्यमापन करण्याच्या विविध आधुनिक पद्धती, डॉक्टर-रुग्ण संवाद आणि वैद्यकीय क्षेत्रातील नैतिक मूल्यांवर भर, शैक्षणिक उपक्रमांचे प्रत्यक्ष सादरीकरण आणि गटचर्चा याद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यशाळेसाठी एकूण २७ वैद्यकीय प्राध्यापकांनी सहभाग नोंदवला. या प्रसंगी महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांनी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील नवनवीन बदल व तंत्रज्ञान शिक्षकांपर्यंत पोहोचवणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले. या कार्यशाळेमुळे बारामती वैद्यकीय महाविद्यालयातील शैक्षणिक दर्जा अधिक उंचावण्यास मदत होईल असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण युनिटच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा भालेराव यांनी केले. तसेच डॉ. पायल बंसल, एन. एम. सी कॉर्डिनेटर यांचे या कार्यशाळेस विशेष मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी डॉ. गीतांजली सुंडके, डॉ. राहुल मस्तुद, डॉ. स्नेहा साठे, डॉ. सुरज जाधवर, डॉ. अक्षय सलगर, डॉ. नितीन पळसे, डॉ. प्रतिभा खटके, डॉ. मनोज पाटेकर, डॉ. मयुरी गजभिये आणि डॉ. वनिता म्याकल यांनी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



