बारामती येथील बी.सी. ई.बी.सी. मुलींच्या शासकीय वसतिगृहाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू

बारामती (बारामती झटका)
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत मागासवर्गीय व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, बारामती येथे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती-भटक्या जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या मागास तसेच दिव्यांग व अनाथ विद्यार्थिनींना शासनाच्या नियमानुसार प्रवेश देण्यात येणार आहे. वसतिगृहातील प्रवेश गुणवत्ता व आरक्षणाच्या निकषांनुसार करण्यात येणार असून विद्यार्थिनींना विनामूल्य निवास, भोजन, बेडिंग साहित्य, स्टेशनरी तसेच निर्वाह भत्ता आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
इच्छुक विद्यार्थिनींनी सामाजिक न्याय विभागाच्या HMAS पोर्टल वर जाऊन ऑनलाइन अर्ज भरावेत. ऑनलाइन अर्जाची प्रिंट व आवश्यक कागदपत्रांसह वसतिगृह कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी https://hmas.mahait.org या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या अधीक्षिका एस. बी. खारतोडे यांनी केले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



