दोन्ही खासदार बिनविरोध; सातारा जिल्हा बँकेत महायुतीने उघडले खाते!

श्रीमंत छत्रपती खा. उदयनराजे भोसले आणि खा. नितीन पाटील यांची बिनविरोध निवड; डीसीसीच्या राजकारणात महायुतीची पहिली मोठी बाजी
सातारा (बारामती झटका)
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माघारीच्या दिवशी महायुतीने मोठी राजकीय बाजी मारली आहे. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि खासदार नितीन पाटील यांची बिनविरोध निवड निश्चित झाली असून, जिल्हा बँकेच्या राजकारणात महायुतीने आपले खाते उघडले आहे.
खा.उदयनराजे भोसले यांच्या विरोधात दाखल झालेला ज्ञानेश्वर पवार यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. त्यामुळे उदयनराजेंचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. त्याचवेळी खा. नितीन पाटील यांचीही बिनविरोध निवड झाल्याने महायुतीच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांकडून एकत्रितपणे निवडणूक लढविण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जोरदार हालचाली सुरू होत्या. त्याचे पहिले ठोस फलित दोन खासदारांच्या बिनविरोध निवडीच्या रूपाने समोर आले आहे.
दोन्ही खासदारांची बिनविरोध निवड ही केवळ दोन जागांची राजकीय घडामोड नसून, जिल्हा बँकेवरील सत्तासमीकरणाच्या दृष्टीने महायुतीने टाकलेले पहिले पाऊल मानले जात आहे. आता उर्वरित जागांवर कोणते उमेदवार माघार घेतात आणि कोण रिंगणात राहतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



