डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त मशरूमच्या औषधी व पोषणमूल्यांवर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

सांगोला (बारामती झटका)
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आणि डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ‘Medicinal and Nutritional Benefits of Mushroom in Daily Diet’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचा पहिला दिवस मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. आमदार डॉ. गणपतराव देशमुख आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शंकर धसाडे यांनी प्रास्ताविक करताना मशरूम शेतीच्या माध्यमातून युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोजकुमार माने यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथील ज्येष्ठ प्रा. डॉ. श्रीकांत रिटे यांनी मार्गदर्शन करताना मशरूमचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व विविध उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट केले. दैनंदिन आहारात मशरूमचा समावेश केल्याने मिळणारे विविध पोषणविषयक व आरोग्यविषयक फायदे त्यांनी सविस्तरपणे विशद केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे सचिव मा. श्री. विठ्ठलराव शिंदे यांनी आपल्या मनोगतात निरोगी आरोग्याबरोबरच रोजगारनिर्मिती आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी मशरूम शेती महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच मशरूमपासून तयार करण्यात आलेल्या काही पदार्थांची स्वतः चाचणी घेतली असून त्यांची गुणवत्ता उत्तम असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्घाटन समारंभाचे आभार प्रा. डॉ. शुद्धोधन कदम यांनी मानले.
उद्घाटन कार्यक्रमानंतर झालेल्या तांत्रिक सत्रात प्रा. डॉ. श्रीकांत रिटे यांनी मशरूम शेतीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये मेडिसिनल व फंक्शनल मशरूम, त्यांचे गुणधर्म, उपयोग आणि आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व याबाबत माहिती देण्यात आली.
त्यानंतरच्या तांत्रिक सत्रात संजीवनी फार्म, नवसारी (गुजरात) चे प्रमुख डॉ. मितेशकुमार पटेल यांनी मशरूम उत्पादनानंतरच्या पॅकिंग, ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग या बाबींवर मार्गदर्शन केले. मशरूम उत्पादनाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी योग्य पॅकिंग, आकर्षक ब्रॅण्डिंग आणि प्रभावी विपणनाचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. सौ. सुप्रिया खंदारे व प्रा. शेख एन. एस. यांनी केले. तांत्रिक सहकार्य प्रा. रसाळ एन. एस. व श्री. कादरी एम. जे. यांनी केले.
या राष्ट्रीय कार्यशाळेमुळे मशरूम शेती, आरोग्यदायी आहार, युवकांसाठी रोजगाराच्या संधी तसेच शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाबाबत सहभागी विद्यार्थी, शेतकरी व उपस्थितांना उपयुक्त आणि व्यावहारिक माहिती मिळाली.
कार्यशाळेची माहिती प्रसिद्धी समितीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



