ऐतिहासिक बारवाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडून कौतुक

आळंदी महामार्ग पाहणीदरम्यान ऐतिहासिक वारसा संवर्धनाची घेतली दखल
पानीव (बारामती झटका)
आळंदी-पुणे-मोहोळ राष्ट्रीय महामार्गाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांनी पानीव (घुलेनगर) येथील ऐतिहासिक बारवाला भेट देत तिच्या संवर्धन कार्याचे विशेष कौतुक केले.
सन २०२१ मध्ये महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे ही ऐतिहासिक बारव बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावेळी प्रकाश पाटील तसेच तत्कालीन सरपंच श्रीलेखा पाटील, ॲड. अभिषेक पाटील यांनी पुढाकार घेत बारवाचे ऐतिहासिक महत्त्व प्रशासनासमोर मांडले होते. तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या काळातील हा ऐतिहासिक वारसा जतन व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे अखेर या ऐतिहासिक बारवाचे संरक्षण करण्यात यश आले.
आज महामार्ग पाहणीदरम्यान केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी बारवाची पाहणी करून तिचे ऐतिहासिक संदर्भ जाणून घेतले. बारवाच्या परिसरात करण्यात आलेल्या वृक्षारोपणाचेही त्यांनी विशेष कौतुक केले. पर्यावरण संवर्धनासोबतच ऐतिहासिक वारसा जपण्याचे कार्य प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या प्रसंगी सरपंच लता कांबळे, सुखदेव घुले, संतोष घुले तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनीही बारव संवर्धनासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



