फलटणच्या सहकाराचा मुडदा पाडणारे रामराजे

फलटण (बारामती झटका)
शेतकरी आणि कामगारांच्या घामावर उभ्या राहिलेल्या ‘श्रीराम सहकारी साखर कारखान्याला’ स्वतःच्या स्वार्थासाठी ओलीस ठेवणारी प्रवृत्ती आता उघडी पडली आहे. स्वतः एकही नवी संस्था उभी न करता, आजोबा मालोजीराजेंनी उभ्या केलेल्या संस्थांची राखरांगोळी करण्याचे पाप रामराजे आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी केले आहे. आपले काळे धंदे लपवण्यासाठी आणि स्वतःच्या चुकांचे खापर दुसऱ्यांवर फोडण्यासाठी आता रणजितदादांच्या नावाने बोटे मोडण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. पण आता फलटणची जनता सत्य ओळखून आहे!
श्रीराम कारखान्याची लूट आणि हुकूमशाही कारभार
श्रीराम कारखाना हा शेतकऱ्यांचे मंदिर आहे, पण सध्या तो भ्रष्टाचाराचा अड्डा बनला आहे. कारखान्याच्या संचालक मंडळाची मुदत संपल्यावर पारदर्शक निवडणुका घेणे टाळून, हजारो सभासदांना अंधारात ठेवून केवळ स्वतःच्या मर्जीतील १८० सभासदांमध्ये निवडणूक घेण्याचा घाट घातला गेला.

श्रीराम मंदिरातूनच कट आणि हणमंतराव पवारांचे निधन : श्रीराम कारखान्याच्या पडझडीला कोण जबाबदार आहे? हा कारखाना बंद पडून तो स्वतःकडे घेता यावा, यासाठी चक्क श्रीराम मंदिरातच बैठक घेऊन “श्रीराम कारखान्याला ऊस घालू नका” असे आवाहन कोणी केले होते? झोन बंदी उठवून कारखाना जाणीवपूर्वक बंद पाडला गेला. या सगळ्या राजकारणाच्या आणि दबावाच्या वातावरणातूनच कै. हणमंतराव पवार यांचे अपघाती निधन झाले. हे पाप आणि हा इतिहास तुम्ही विसराल परंतु इथली जनता कधीही विसरणार नाही.
प्रशासकाला विरोध : ही लूट थांबवण्यासाठी शासनाने प्रशासक आणला, पण पारदर्शकतेमुळे आपली दुकाने बंद होतील या भीतीने उच्च न्यायालयात जाऊन यांनी प्रशासक नियुक्ती रद्द केली.

आवाज दाबण्याचा प्रयत्न : विशेष सर्वसाधारण सभेत विरोधी सभासद आणि नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे प्रश्न विचारले, तेव्हा पायाखालची वाळू सरकलेल्या सत्ताधाऱ्यांनी स्टेजवरून खाली उड्या मारून त्यांच्या हातातील माईक हिसकावून घेतला आणि सिस्टीमच बंद पाडली, ही कसली लोकशाही?
‘दत्त इंडिया’चा डाव आणि आर्थिक गैरव्यवहार
गेली १५-२० वर्षे सभासदांना साध्या मिटिंगलाही बोलावले गेले नाही. १५ वर्षे कारखाना चालवणारे ‘जवाहर’वाले अचानक कंत्राट सोडून का गेले, याचे उत्तर आजही गुलदस्त्यात आहे.
- राज्य सरकारची पूर्वपरवानगी न घेता, केवळ ‘दत्त इंडिया’लाच कारखाना घशात घालण्यासाठी निविदा काढण्यात आल्या.
- विशेष सभेच्या आधीच ७ तारखेला निविदा काढून त्या स्थानिक वर्तमानपत्रांत न देता जाणीवपूर्वक लपवून ठेवल्या गेल्या.
- कोणतीही पारदर्शकता न ठेवता कारखान्याची तब्बल ४५ एकर जमीन विकण्यात आली आहे.
- जुन्या मशिनरीला नवीन दाखवून केलेला भ्रष्टाचार एवढा मोठा आहे की, याची सखोल चौकशी झाल्यास यांच्यामागे नक्कीच ‘ईडी’चा (ED) ससेमिरा लागेल. या अनियमिततेमुळेच बँका आता यांना कर्ज द्यायला तयार नाहीत.

संचालकांच्या गळ्याभोवती फास
या बेबंदशाहीचा आणि भ्रष्ट कारभाराचा सर्वात मोठा फटका कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि अज्ञानी संचालकांना बसणार आहे. यांच्या चुकीच्या निर्णयांमुळे भविष्यात १० वर्षांच्या फौजदारी गुन्ह्याखाली जेलची हवा खाण्याची वेळ या संचालकांवर येऊ शकते, तसेच त्यांच्या वैयक्तिक जमिनींवर बोजे चढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वडीलोपार्जित संस्थांची राखरांगोळी
मालोजीराजेंनी रयतेसाठी संस्था काढल्या, पण रामराजे आणि त्यांच्या बंधूंना मालोजीराजेंच्या नखांचीही सर नाही. स्वतः एकही संस्था काढली नाही, उलट असलेल्या संस्था धुळीला मिळवल्या.
- मालोजी बँक : बुलढाणा पतसंस्थेला चालवायला देऊन मोकळे झाले.
- फलटण तालुका सहकारी दूध संघ : जागेचा लिलाव करून दूध संघ अडचणीच्या खाईत ढकलला.
खरेदी-विक्री संघ : फलटण तालुक्यातून हा संघ गायबच झाला आहे.
- फलटण शुगर वर्क्स (साखरवाडी): १२ हजार सभासदांच्या मालकीची ही जॉईंट स्टॉक कंपनी कुणाला विचारून दत्त इंडियाला चालवायला दिली? शेतकऱ्यांचे पैसे दिले का? ‘धारू’ नावाच्या प्याद्याचा वापर करून रामराजेंनी साखरवाडीवर मोठा दरोडा घातला आहे. आता श्रीराम कारखान्यालाही तेच ग्रहण लावण्याचा डाव आहे.
- विकासाला खीळ आणि जमिनींवर डल्ला
यांचे कर्तृत्व केवळ संस्था बुडवण्यापुरते मर्यादित नाही. पूर्वजांनी लोकांसाठी दिलेल्या जागा यांनी परत घेतल्या आहेत. शेरेचीवाडी गावात तर अक्ख्या गावावर स्वतःची नावे चढवली आहेत. फलटण शहराचा विकास होऊ नये म्हणून विमानतळ सुरू करण्याच्या विरोधात हे कोर्टात गेले. विकासाला खीळ घालणे हाच यांचा अजेंडा आहे. - कमिन्सची मेहेरबानी: कमिन्समध्ये ‘कोळकीतील बोलत्या पोपटाला’ आणि ‘होळच्या महाराणीला’ काम दिले. ज्यांना तिथे काम दिले, तेच आता मालकांची पोपटपंची करत आहेत.
रणजितदादांचा सत्याचा लढा
आता कारखाना चालवणे शक्य नाही हे यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे कामगार आणि सभासदांचे डोके भडकवण्यासाठी सभा घेण्याचे नाटक सुरू आहे. रणजितदादांनी कारखान्याचा गळीत हंगाम अजिबात बंद पाडलेला नाही! त्यांनी फक्त ‘दत्त इंडिया’ला बेकायदेशीररीत्या कारखाना देण्याच्या निर्णयाला स्थगिती आणून हा कारखाना वाचवण्याचे महान कार्य केले आहे.

शेतकरी आणि कामगार बांधवांना आवाहन :
खोट्या भूलथापांना आणि मगरीच्या अश्रूंना बळी पडू नका. आपला हक्काचा श्रीराम कारखाना या प्रवृत्तीच्या खाजगी घशात जाण्यापासून वाचवायचा असेल, तर सत्य ओळखा. आता वेळ आली आहे ती रणजितदादांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची!
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



