जिजाऊंच्या पोटी छत्रपती जन्माला आले तो दिवस धन्य झाला – निवृत्ती देशमुख इंदुरीकर

खंडाळी ( बारामती झटका )
जिजाऊंच्या पोटी छत्रपती जन्माला आले तो दिवस धन्य झाला असल्याचे छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती खंडाळी – दत्तनगर यांनी शिवाजी महाराजांच्या ३९६ व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कीर्तनामध्ये श्रीमती पार्वतीबाई ननवरे हायस्कूल खंडाळी ता. माळशिरस येथे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती देशमुख इंदुरीकर यांनी सांगितले. प्रथम इंदुरीकर यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन जि. प. सदस्य मारुती लोंढे, माजी उपसरपंच सुभाष गांधी, पं. स. सदस्य महादेव साबळे यांच्या प्रमुख उपस्थितित करण्यात आले. कार्यक्रमास माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, अकलूजचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन नितीन निंबाळकर यांनी कार्यक्रमास भेट दिली.
पुढे कीर्तनामध्ये महाराज म्हणाले की, बहिणाबाईंना तुकाराम महाराज भेटले तो दिवस धन्य झाला. एकनाथ महाराजांचा जन्म व जलसमाधी नाथषष्ठीलाच आहे सर्व संतांमध्ये एकनाथ महाराज श्रीमंत संत होऊन गेले. आजही तेथे नैवेद्य परंपरेने पुरणपोळीचा दाखवला जातो. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, निवृत्ती महाराज हे पाच संत सांप्रदयाचा प्राण आहेत. हे जग सुखी व्हावे असे संतांना वाटते. ज्ञानेश्वर महाराजांनी सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली ते जगाचे माऊली झाले. छत्रपतींनी स्वराज्याची स्थापना करण्याची शपथ सोळाव्या वर्षी घेतली. अनेकांना वाटते पैसा मला मुबलक मिळावा. मान मिळावा, माझ्या पुढे दुसरा कोणी जाऊ नये, पाप करून मिळवलेला पैसा सुख देत नाही. “सर्वांनी एक लक्षात ठेवा कर्म कोणालाही सोडत नाही. सगळ्याला माफी आहे पण कर्माला माफी नाही. “ज्ञानेश्वरीमध्ये सोळाव्या अध्यायात असूरी व देवी संपत्तीवर ओवी आहे. रावणाची असुरी संपत्ती व रामाची दैवी संपत्ती होती. पापाचा पैसा जास्त दिवस राहत नाही. ज्यांनी असा पैसा कमवला त्यांचे घरी एक तरी वेडा किंवा बेवडा किंवा आजारी तर आहे. असे लोक कधी एकादशीचा उपवास करत नाहीत किंवा सोमवारचा उपवास करत नाहीत. अष्टप्रधान मंडळाची नेमणूक करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे विश्वातले पहिले राजे आहेत. छत्रपतींनी मावळ्यांची मनं मोठी केली होती. दुबळी केली नव्हती. त्यांचे मावळे चांगले होते. आजही प्रत्येक गावात दोन-चार मावळे निष्ठावान आहेत. आपल्याला शिवजयंती नाही तर धर्मजयंती साजरी करायची आहे. ४०% मुलं मोबाईलमुळे बिघडली आहेत. २०% लोक शेअर मार्केटमुळे बरबाद झाली. दारू, जुगार, मोबाईलमुळे, आई-वडिलांच्या अतीलाडामुळे मुलं वाया गेली.

शिवजयंती तसेच गावाच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवून गट तट विसरून सर्वांनी एकत्र यावे. गावचा विकास करावा. मित्र चांगले असावेत. जो मित्र तोंडावर स्तुती करतो तोच घात करतो. ८०% लोकांचे संसार मित्रांनीच उध्वस्त केलेत. अंगणवाड्या डिजिटल झाल्या पाहिजेत. गावातील मराठी शाळा वाचल्या पाहिजे. अनेक क्लासवन अधिकारी मराठी शाळेतच शिकलेले आहेत.
इंदुरीकर महाराजांनी संत एकनाथ महाराजांच्या धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा क्षीण गेला । या अभंगावर दोन तास कीर्तन केले. शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने किर्तनासाठी येणाऱ्या सर्वांना शिवभोजन देण्यात आले. ग्रामस्थांच्या वतीने अपस्थितांचे आभार मानण्यात आले. – शरद भोसले (सर ) खंडाळी
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



