खते, बियाणे, कीटकनाशके परवाना अधिकार पुन्हा झेडपीला द्या ; सोलापूरच्या कृषी समितीत ठराव

सोलापूर (बारामती झटका)
जिल्हा परिषद सोलापूरच्या कृषी विभागाची विषय समितीची पहिली सभा आज शिवरत्न सभागृह येथे उत्साहात पार पडली. या सभेच्या अध्यक्षस्थानी कृषी समितीचे सभापती रामप्पा चंद्रशेखर चिवडशेटटी होते. नव्याने निवडून आलेल्या सदस्यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली. यावेळी कृषी अधिकाऱ्यांच्या हस्ते सदस्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
सभेत कृषी क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करून ठराव मंजूर करण्यात आले. जिल्ह्यात सध्या केवळ एकच माती परीक्षण प्रयोगशाळा उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे प्रत्येक तालुक्यात एक माती परीक्षण प्रयोगशाळा स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण ठराव घेण्यात आला. तसेच, आपत्कालीन परिस्थितीत घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येक शेतकऱ्याने बायोगॅस संयंत्र उभारणी करावी यासाठी शासनाकडून वाढीव निधी व लक्ष्य देण्याबाबत प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला.
निविष्ठा परवान्यांबाबत (रासायनिक खते, बियाणे व कीटकनाशके) 2018 पासून जिल्हा परिषदेकडून अधिकार काढून घेतल्यामुळे शेतकऱ्यांना गैरसोय होत असल्याचे नमूद करून हे अधिकार पूर्ववत कृषी विकास अधिकाऱ्यांकडे देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला.
ट्रॅक्टरचलित कृषी औजारे खरेदीसाठी वाढीव अनुदान व लक्ष्य देण्याबाबत ठराव घेऊन तो विषय जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सन 2025-26 साठी कृषी साहित्य खरेदीचा आढावा घेण्यात आला.
याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत अनुसूचित जाती-जमातीतील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी प्रभावी अंमलबजावणी, जनजागृती व प्रचारावर भर देण्याच्या सूचना देण्यात आल्या. सभेचा शेवट शेतकरी हिताच्या विविध निर्णयांमुळे सकारात्मक वातावरणात झाला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



