ताज्या बातम्याराजकारणसामाजिक

माढ्याच्या विकासाला मिळणार ‘बुलेट’ गती…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची नवी दिल्लीत महत्त्वपूर्ण भेट !

दिल्ली (बारामती झटका)

माढा लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान मतदारसंघातील रेल्वे, रस्ते आणि बुलेट ट्रेन यांसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या पाठपुराव्याला यश येताना दिसत असून, अधिवेशनानंतर तातडीने केंद्र व राज्य शासनाची संयुक्त बैठक घेण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले आहेत.

या भेटीबाबत देण्यात आलेल्या माहितीनुसार, भेटीत प्रामुख्याने मुंबई-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पावर चर्चा झाली. रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदार असताना या प्रकल्पाला तांत्रिक मंजुरी मिळाली होती. या तांत्रिक बाबींची पूर्तता करून पुढील कार्यवाही करण्यासाठी पंतप्रधानांनी संबंधित विभागाला तातडीने निर्देश दिले आहेत. आगामी कॅबिनेट बैठकीत या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळवून कामाला सुरुवात करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. तसेच, मुंबई-बेंगळुरू कॉरिडॉर हायवे बाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश पंतप्रधानांनी सचिवांना दिले आहेत.

रेल्वे प्रकल्पांचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माढा मतदारसंघातील रेल्वे प्रकल्पांबाबत विशेष आस्था दाखवली. बारामती-फलटण आणि फलटण-माळशिरस-पंढरपूर या रेल्वे मार्गांच्या कामाची सद्यस्थिती आणि प्रगतीची संपूर्ण माहिती त्यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडून घेतली. मतदारसंघातील दळणवळण व्यवस्था भक्कम करण्यासाठी हे प्रकल्प वेळेत पूर्ण होणे गरजेचे असल्याचे मत पंतप्रधानांनी व्यक्त केले, असल्याचेही सांगण्यात आले आहे.

केंद्र व राज्य शासनाची होणार संयुक्त बैठक
मतदारसंघातील जे प्रश्न केंद्र आणि राज्य शासनाच्या समन्वयाअभावी प्रलंबित आहेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी पंतप्रधानांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलली आहेत. संसदेचे अधिवेशन संपताच माढा मतदारसंघातील प्रश्नांसाठी केंद्र आणि राज्य शासनाची संयुक्त बैठक आयोजित करण्याचे निर्देश मोदींनी दिले आहेत. या बैठकीमुळे मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले पायाभूत सुविधांचे प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होणार आहे, असा विश्वास माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी व्यक्त केला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button