महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार एकनाथ पराडे पाटील यांना जाहीर.

वाघोली (बारामती झटका)
बाभुळगाव, ता. माळशिरस येथील श्री. एकनाथराव पराडे पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार नुकताच जाहीर झाला असून त्या पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्याचे थोर कीर्तनकार व महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष व मार्गदर्शक ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. एकनाथ पराडे पाटील हे गेली 20 वर्षापासून माळशिरस तालुक्यात तालुक्याबरोबर सोलापूर जिल्ह्यातील व संघटनेच्या माध्यमातून इतर भागात ही व्यसनमुक्तीचे व समाज प्रबोधनाचे काम करीत आहेत.
महाराष्ट्र शासनाने पुरस्कार कर्त्याची जी यादी जाहीर केली आहे. त्या यादीत सोलापूर जिल्ह्यातील मौजे बाभूळगाव, ता. माळशिरस येथील श्री. एकनाथराव पराडे पाटील हे एकमेव पुरस्कार प्राप्त समाजसेवक आहेत. श्री. एकनाथराव पराडे पाटील यांनी व्यसनमुक्ती संघटनेच्या माध्यमातून मौजे बाभूळगाव येथे गेल्या वीस वर्षापासून दारूबंदी केली असून गावातील व तालुक्यात व्यसनमुक्ती करणे रक्तदान शिबिरे घेणे, ग्राम स्वच्छता अभियान राबवणे अशा विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. याच कार्याची महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाने दखल घेऊन श्री. एकनाथरावजी पराडे पाटील यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
माळशिरस तालुक्यात व तालुक्याच्या पूर्व भागातील एक मोठे सामाजिक कार्य ते राबवत आहेत. सदरचा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्राचे व्यसनमुक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ह. भ. प. श्री. बंडातात्या कराडकर तसेच माळशिरस तालुका व्यसनमुक्ती संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच सर्व पदाधिकारी व बाबुळगाव येथील पंचायत समिती माळशिरसचे माजी सभापती रावसाहेब पराडे पाटील, तसेच व्यसनमुक्ती संघटनेचे सचिन शिंदे धैर्यशील देशमुख, विलासबाबा जवळकर, प्रा. धनंजय देशमुख, दीपक जाधव, सुनील पाटील, तसेच पूर्व भागातील मान्यवरांनी श्री. एकनाथराव पराडे पाटील यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



