ताज्या बातम्याराजकारण

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटील यांच्या नेतृत्वात फलटण तालुक्याची धैर्यशील कदम यांना खंबीर साथ; नगराध्यक्षांची ग्वाही

फलटण (बारामती झटका)

सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघाची निवडणूक सध्या चांगलीच रंगात आली आहे. या निवडणुकीतील भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी त्यांच्या प्रचाराचा व गाठीभेटींचा वेग वाढवला असून, नुकतीच त्यांनी फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची सदिच्छा भेट घेतली.

सातारा-सांगली विधानपरिषदेसाठी महायुतीकडून धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप यांच्यात थेट लढत होत आहे. या निवडणुकीत स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी हे मतदार असल्याने, या सदिच्छा भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या रणनीतीबाबत, मतदारांच्या गाठीभेटी आणि सध्याच्या राजकीय परिस्थितीबाबत अत्यंत सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली.

धैर्यशील कदम यांना फलटण तालुक्याची खंबीर साथः नगराध्यक्ष
या भेटीदरम्यान नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी महायुतीच्या उमेदवाराला पूर्ण ताकदीने विजयी करण्याचा शब्द दिला. “माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार सचिन पाटील यांच्या खंबीर साथीने सातारा-सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीत फलटण तालुक्याची खंबीर साथ ही महायुतीचे अर्थात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार धैर्यशील कदम यांच्याच पाठीमागे उभी केली जाईल,” अशी महत्त्वपूर्ण ग्वाही नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी दिली.

या महत्त्वाच्या भेटीप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष चिन्मय कुलकर्णी, फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन अहिवळे आणि युवा नेते यश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

या गाठीभेटीमुळे व मिळालेल्या भक्कम पाठिंब्यामुळे विधानपरिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत फलटणमधील राजकीय हालचालींना वेग आला असून, महायुतीच्या उमेदवाराकडून विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button