ताज्या बातम्याराजकारण

माळशिरस नगरपंचायतीचे विद्यमान नगराध्यक्ष रघुनाथ पांडुरंग चव्हाण यांचा शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश

वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचे शिवधनुष्य हातात घेतले….

माळशिरस (बारामती झटका)

माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रघुनाथ पांडुरंग चव्हाण यांनी १ जुलै रोजी मुंबई येथील नंदनवन या निवासस्थानी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत अधिकृत पक्षप्रवेश केला. माळशिरस तालुक्याच्या राजकारणातील ही एक महत्त्वपूर्ण घडामोड मानली जात असून, या पक्षप्रवेशामुळे तालुक्यात शिवसेनेच्या संघटनात्मक विस्ताराला नवी दिशा मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. रघुनाथ चव्हाण यांचा जनसामान्यांशी असलेला दृढ संपर्क, संघर्षातून घडलेले नेतृत्व आणि विकासाभिमुख कार्यशैली लक्षात घेता, आगामी काळात ते माळशिरस तालुक्यात शिवसेनेचा विस्तार वटवृक्षाप्रमाणे भक्कमपणे करतील, असा विश्वास पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण यांचा ३ जुलै रोजी वाढदिवस असतो वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सर्वांगीण विकासासाठी शिवसेनेचे शिवधनुष्य हातात घेतलेले आहे..

सामान्य कुटुंबातून आलेले रघुनाथ चव्हाण यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हमालीचे काम करत आपल्या जीवनप्रवासाची सुरुवात केली. कष्ट, जिद्द आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी समाजात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. अथक परिश्रम, जनसंपर्क, समाजसेवा आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने केलेल्या संघर्षाच्या बळावर त्यांनी स्थानिक राजकारणात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. सामान्य कार्यकर्त्यापासून नगराध्यक्षपदापर्यंतची त्यांची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

नगराध्यक्ष म्हणून रघुनाथ चव्हाण यांनी केलेली विकासकामे, सर्वसामान्य नागरिकांशी कायम ठेवलेला जवळचा संपर्क, जनहितासाठी घेतलेले निर्णय आणि संघर्षशील नेतृत्वाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी त्यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले. त्यांच्या कामाप्रती असलेली निष्ठा, जनतेसाठीची तळमळ आणि नेतृत्वक्षमता पाहून त्यांना शिवसेनेत महत्त्वाची संधी देणे योग्य असल्याचे मत व्यक्त करत, आपल्या हस्ते त्यांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत केले.

पक्षप्रवेशानंतर रघुनाथ चव्हाण यांनी सांगितले, “मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या हितासाठी अधिक जोमाने काम करण्याची संधी मिळाल्याचा मला आनंद आहे. माळशिरस तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि शिवसेनेची विचारधारा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मी पूर्ण ताकदीने कार्यरत राहीन.”

या पक्षप्रवेश सोहळ्यास शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध मान्यवर उपस्थित होते. माळशिरस तालुक्याच्या राजकीय घडामोडींमध्ये या पक्षप्रवेशाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, आगामी काळात रघुनाथ पांडुरंग चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button