मोहिते पाटलांच्या दहशतीतून माळशिरस तालुका मुक्त करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस

माळशिरस (बारामती झटका)
मोहिते पाटील घराण्याने आजपर्यंत अनेक लोकांच्या जमिनी बळकावल्या, लोकांवर हल्ले केले मात्र, यापुढे हे सहन केले जाणार नाही. मी या माळशिरस तालुक्याला मोहिते पाटील यांच्या दहशतीतून मुक्त करणार आहे, असे रोखठोक प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी केले.
मंगळवारी माळशिरस येथे भाजपचे उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या कामाची तोंड भरून प्रशंसा केली. तसेच भाजपची साथ सोडून शरद पवार गटात दाखल झालेल्या मोहिते पाटील घराण्यावर जोरदार हल्ला चढवला.
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात माढ्यात उभा असणाऱ्यांचा इतिहास बघा. या तालुक्याला मी त्यांच्या दहशतीपासून मुक्त करणार आहे. ही लोकशाही आहे. त्यामुळे तिकडे ही ठोकशाही चालू देणार नाही. काही दिवसांपूर्वी शरद पवार, विजयसिंह मोहिते पाटील व सुशीलकुमार शिंदे यांनी आम्ही वीस वर्षांनी एकत्र आल्याचे सांगितले. आम्ही पुढच्या पिढीच्या भल्यासाठी एकत्र आलो, असे ते लोकांना सांगत होते. पण, शरद पवार हे सुप्रिया सुळे, सुशीलकुमार शिंदे हे प्रणिती शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी एकत्र आले आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले.
कृष्णा-भीमा योजनेवरून टीका
माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण केला. या ठिकाणी पाणी आले, रेल्वे आली. आता येथील ३६ गावांच्या पाण्याचा जो प्रश्न प्रलंबित आहे, तो सोडवण्याचा शब्द मी तुम्हाला देतो. यापूर्वी माढ्यात कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेचा मोठा गवगवा करण्यात आला. या भागातील लोकांना वारंवार पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. मी मुख्यमंत्री झाल्यावर कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेची फाईल उघडली. तेव्हा पाणी उपलब्ध नाही, असा शेरा मारून ती बंद करण्यात आली होती, असं फडणवीस म्हणाले.
फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टला जागतिक बँकेची मान्यता
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे आपल्याला फ्लड डायव्हर्शन प्रोजेक्टला जागतिक बँकेने तत्वतः मान्यता दिली आहे. त्यासाठी पैसे देण्याचे जागतिक बँकेने मान्य केले आहे. त्यामुळे आता कृष्णा नदीत वाहून जाणारं पुराचे पाणी आपल्याला उजनीत आणता येईल. यासाठी खासदार रणजितसिंह यांनी पाठपुरावा केला आहे. मोदींसारखा नेता पाठीशी असेल तरच हे शक्य आहे. या भागात महामार्ग, पाण्याच्या योजना हे सर्व काही मोदींमुळे शक्य झालं आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
रामोशी धनगर समाजाच्या मागे महायुती
माढ्यातील रामोशी समाज प्रामाणिक आहे. या समाजाचा वापर आणि अध:पतन करण्याचा प्रयत्न झाला. पण महायुती रामोशी आणि धनगर आणि इतर सर्व समाजाच्या पाठीशी उभी राहील, असं फडणवीस यांनी सांगितलं. या समाजाच्या विकासासाठी आणि आर्थिक स्थर उंचावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ते यावेळी म्हणाले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा