Uncategorizedताज्या बातम्याराजकारण

जयसिंह मोहिते पाटील यांनी विरोधी गटाच्या प्रचार शुभारंभाची सभा गुंडाळून लावली….

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार शुभारंभ सभेच्या जागेमध्ये बदल करण्यात आला…

अकलूज ( बारामती झटका )

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील विरोधी गटाच्या प्रचार शुभारंभाची सभा सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते जयसिंह मोहिते पाटील यांनी गुंडाळून लावलेली आहे. अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिवर्तन पॅनलच्या प्रचार शुभारंभाच्या जागेत बदल करण्यात आला.

अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सत्ताधारी मोहिते पाटील गटाच्या प्रचाराचा शुभारंभ शिवरत्न बंगला येथे झालेला आहे. परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ शुक्रवार दि. २१/०४/२०२३ रोजी सकाळी ठीक ९ वा. अकलाई मंदिर येथे पॅनल प्रमुख अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष फत्तेसिंह माने पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार होता. सकाळी ९ वाजता अकलाई मंदिर परिसरामध्ये झाडाच्या छत्रछायेखाली अकलाई देवीला श्रीफळ वाढवून सभेचे नियोजन केलेले होते. खुर्च्या, फारी, सतरंजी, स्पीकर लावून यंत्रणा सज्ज केलेली होती. मंगळवार व शुक्रवार अकलाई देवीचे दर्शन घेण्याकरता जयसिंह मोहिते पाटील येत असतात. शुक्रवार असल्याने अकलाई देवीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना झाडाखाली राजकीय सभेचे आयोजन असल्याचे दिसल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेले चार-पाच कार्यकर्ते यांच्याकडे चौकशी केली असता प्रचाराचा शुभारंभ करण्याची सभा होणार असल्याचे जनसेवेच्या सूत्रावे यांनी सांगितल्यानंतर त्यांनी सर्व साहित्य गुंडाळायला लावले. प्रमुख कोणीच नसल्याने कार्यकर्त्यांनी सामानाची आवरा आवर केली.

जयसिंह मोहिते पाटील यांनी या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम केले जातात, राजकीय कार्यक्रम केले जात नाही, असे उपस्थित कार्यकर्त्यांना सांगितले होते. प्रमुख नेते मंडळी आल्यानंतर कार्यकर्त्यांनी झालेली हकीगत सांगितली. त्यावेळेला नेते व कार्यकर्ते यांच्यामध्ये संतापाची लाट उसळलेली होती. माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटील यांच्या सभा व कॉर्नर बैठका अनेक गावांमध्ये मंदिरामध्ये होत आहेत. मग अकलाई मंदिर याच ठिकाणी मोहिते पाटील यांना अडचण का ?, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात होता. काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झालेले होते. जर सकाळी लवकर नेते व कार्यकर्ते हजर असते तर निवडणुकीला वेगळे वळण लागले असते. मात्र, कोणताही अनुचित प्रकार न होता सर्व नेते मंडळींनी अकलाई मंदिर परिसरातील सांस्कृतिक भवन येथे भाषणाचा कार्यक्रम करून अकलाई मंदिर येथे श्रीफळ वाढविलेला आहे. मात्र, विरोधी गटाच्या नेते व कार्यकर्ते यांना सभेच्या जागेमध्ये बदल करावा लागला असल्याची चर्चा तालुक्यामध्ये वाऱ्यासारखी पसरलेली आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Back to top button