पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर माळशिरस पालखी तळाची पाहणी जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन यांनी केली

विविध सुविधांचा आढावा घेतला, नगराध्यक्ष व नगरपंचायत प्रशासनाने योग्य नियोजन केल्याने जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले….
माळशिरस (बारामती झटका)
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर माळशिरस येथील पालखी तळाची आज बुधवार दि. 15 जुलै 2026 रोजी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) तसेच विविध शासकीय विभागांच्या अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे पाहणी केली. यावेळी माळशिरस नगरपंचायतीचे नगराध्यक्ष रघुनाथ पांडुरंग चव्हाण उपस्थित होते.
पाहणीदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधा आणि त्यासाठी सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पालखी तळावर वीज व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छता, मुरमीकरण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी, सुरक्षितता व्यवस्था तसेच इतर आवश्यक नागरी सुविधांबाबत संबंधित विभागांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाधिकारी एन. कार्तिकेयन यांनी सर्व विभागांनी आपापसातील समन्वय राखून वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले. पालखी सोहळा सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पार पडावा यासाठी आवश्यक ती सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.
नगराध्यक्ष रघुनाथ पांडुरंग चव्हाण यांनी नगरपंचायतीमार्फत पालखी तळावर स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रकाश व्यवस्था आणि इतर आवश्यक सुविधा उत्तम प्रकारे उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनासोबत समन्वयाने काम सुरू असल्याची माहिती दिली. वारकऱ्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी नगरपंचायत कटिबद्ध असून सर्व सुविधा वेळेत उपलब्ध करून दिल्या जातील, असेही नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण यांनी सांगितले. त्यावेळी नगरपंचायत प्रशासन व नगराध्यक्ष यांच्या कार्याचे समाधान व्यक्त केले…

या पाहणीप्रसंगी नगरपंचायतीचे अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभाग, पोलीस प्रशासन तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



