ताज्या बातम्याराजकारण

पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा, सभापती पै. दत्ताभैया मगर यांनी रोवला अटकेपार झेंडा..

माती, नाती आणि संस्कृती जपणाऱ्या मगराचे निमगाव गावाला पंचायत समिती सभापती पदाची संधी मिळाली…

माळशिरस (बारामती झटका)

सोलापूर जिल्ह्यामध्ये पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाच्या निवडी 12 मार्च 2026 रोजी पार पडलेल्या आहेत. त्यामध्ये निमगाव मगराचे गावचे युवा नेतृत्व पैलवान दत्ताभैय्या रावसाहेब मगर यांना माळशिरस पंचायत समिती सभापती पदावर विराजमान होण्याचा बहुमान मिळालेला आहे. पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा त्रिलोकी झेंडा या उक्तीप्रमाणे नूतन सभापती पैलवान दत्ताभैय्या मगर यांनी अटकेपार झेंडा रोवला असल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे. माळशिरस तालुक्यातच नव्हे तर राज्यात व देशात माती, नाती आणि संस्कृती जपणाऱ्या मगराचे निमगाव गावाला पंचायत समिती सभापती पदाची संधी मिळालेली आहे…

निमगाव गावचे आराध्य दैवत श्री खंडोबा देवाच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गावांमध्ये शेती, कुस्ती, राष्ट्रसेवा, शिक्षण, पारंपारिक खेळ, गजी ढोल, वावडी महोत्सव, अशा अनेक विविधतेने निमगाव मगराच्या गावची तालुक्यात ओळख आहे. राजकारणामध्ये जिथे कुठे असतील त्या ठिकाणी एकनिष्ठ राहण्याची परंपरा आहे. गावामध्ये शेतीच्या उत्पन्नात स्पर्धा असते. उत्पन्नाच्या बाबतीतही समृद्ध गाव आहे. कुस्तीची परंपरा असलेल्या गावामध्ये महाराष्ट्र केसरी, शिवछत्रपती पुरस्कार, ऑल इंडिया किताब, मल्लसम्राट असे अनेक पुरस्कार पैलवानांना मिळाले आहेत. कुस्तीची परंपरा जपणारं गाव या गावांमध्ये सैनिकांपासून ते कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांपर्यंत राष्ट्र सेवेची परंपरा सुरू असून गावांमध्ये राजकारणापुरते राजकारण व इतर वेळी समाजकारण असा गावचा राजकीय इतिहास आहे..

नूतन सभापती पैलवान दत्ताभैय्या मगर यांच्या घराण्याला शेती, कुस्ती व राजकारणाची परंपरा आहे. स्वर्गीय नानासाहेब विठोबा मगर उर्फ दादा यांचा गावच्या राजकीय जडणघडणीत मोलाचा वाटा आहे. त्यांनी वीस वर्षापेक्षा जास्त सरपंच पदावर काम केलेले आहे. गावच्या राजकारणाबरोबर तालुक्याच्या राजकारणात सुद्धा दादा सक्रिय होते. माळशिरस पंचायत समितीच्या सदस्य पदावर देखील त्यांनी काम केलेले आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखाना लिमिटेड शंकरनगर अकलूज येथे व्हाईस चेअरमन पदावर काम केलेले आहे. दादांनी राजकारण व समाजकारण करीत असताना उत्कृष्ट शेती करून त्यांना जनतेने बळीराजा पदवी बहाल केलेली होती. डोंगर व खडकाळ जमिनीवर अफाट कष्ट करून सुजलाम सुफलाम शेती करणारे तालुक्यामधील प्रगतशील बागायतदार होते. दादांनी कुस्तीची परंपरा जोपासलेली होती. लहान बंधू पैलवान रावसाहेब मगर उर्फ आप्पा यांना कुस्तीचे धडे देऊन आप्पा नामांकित पैलवानांमध्ये गणले जायचे. उंची पुरी देहयष्टी असल्याने त्यांना छत्रपती शाहू महाराजांची प्रतिकृती समजली जाते. त्यांना मल्लसम्राट ही पदवी बहाल केलेली आहे. चुलते नानासाहेब दादा व वडील रावसाहेब आप्पा यांच्या जडणघडणीत पैलवान दत्ताभैया मगर यांची वाटचाल सुरू आहे. पैलवान दत्ता भैया मगर यांनीही कुस्ती क्षेत्रामध्ये आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. गावामध्ये कोट्यावधी रुपयाची तीन मजली भव्य दिव्य इमारत उभी केलेली आहे. गावची परंपरा वावडी महोत्सव हा सुद्धा दत्ता भैय्या यांनी गावच्या परंपरेचा नाद जोपासून वावडी महोत्सव घेतला जातो. अशी घराण्याची परंपरा तिसऱ्या पिढीमध्ये सुद्धा सुरू आहे.

राजकारणामध्ये संधी येत असते जात असते परंतु, मगर परिवार यांनी समाजकारण व राजकारणापासून कधीही फारकत घेतलेली नाही. नानासाहेब दादा पंचायत समितीचे सदस्य होते. त्यावेळेला उपसभापती पदाची संधी मिळत होती. परंतु, राजकीय समीकरणासाठी माणिकराव कर्णवर पाटील यांना संधी देऊन त्याकाळी त्यागाची भूमिका दाखवलेली होती. पिताश्री रावसाहेब आप्पा मगर यांचा पंचायत समिती निवडणूक पराभव झालेला होता. मातोश्री सौ. मधुमती रावसाहेब मगर उर्फ काकी यांचा जिल्हा परिषदेला पराभव झालेला होता. पैलवान दत्ताभैया मगर त्यांच्या मनामध्ये आई-वडिलांच्या पराभवाचे कायम शल्य होते आणि आपले चुलते बळीराजा नानासाहेब दादा यांचे अपुरे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दत्ता भैया मगर यांनी सामाजिक व राजकीय कार्यामध्ये कंबर कसलेली होती. तालुक्यामध्ये सर्व जाती धर्मातील मित्रांच्या माध्यमातून घराण्याची ओळख असताना सुद्धा स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली होती. पूर्वीपासून मगर घराणे नेतृत्वाशी एकनिष्ठ असल्याने निमगाव पंचायत समिती गण सर्वसाधारण असल्याने पैलवान दत्ता भैया मगर यांना पंचायत समितीची उमेदवारी मिळाली. भरघोस मताने मतदारांनी मतदान देऊन निवडून दिलेले होते. तालुक्यामध्ये सभापती पदासाठी वेगवेगळ्या राजकीय चर्चा होत्या मात्र, खंडोबाचा आशीर्वाद, काळ्या व लाल मातीशी इमान, घराण्याची नेतृत्वावर एकनिष्ठता, मित्र परिवारांचा आशीर्वाद, गोरगरीब व सर्व सामान्य जनतेची सेवा करण्याची मनामध्ये इच्छा अशा अनेक गोष्टी एकत्र येऊन पैलवान दत्ताभैय्या मगर यांना निमगाव गावचे पहिले सभापती होण्याचा बहुमान मिळालेला आहे. त्यामुळे आई-वडिलांचा पराभव व नानासाहेब दादांचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळालेली असल्याने पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा. सभापती पैलवान दत्ता भैया मगर यांनी अटकेपार झेंडा रोवलेला असल्याने निमगावकरांच्या अपेक्षा पूर्ण झालेल्या आहेत..

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button