तब्बल ३३ वर्षांनी भेटले “महर्षि” चे १०० मित्र-मैत्रिणी

प्रामाणिक कष्ट करणाऱ्यांना काहीच कमी पडत नसते – बी. के. मुळे

अकलुज (बारामती झटका)

शिक्षकांनी कर्तव्यात कसर न करता ज्ञान दानाचे पवित्र कार्य केले तरच यशस्वी विद्यार्थी तयार होतात. चांगला विद्यार्थी निर्माण करणे हे समाज व देशासाठी गरजेचे आहे. हे सर्व साध्य करण्यासाठी प्रामाणिक कष्टाची गरज आहे. कारण प्रामाणिकपणे कष्ट केले तर आयुष्यात काहीही कमी पडत नसते, असा मौलीक सल्ला महर्षि शंकरराव मोहिते प्रशालेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी. के. मुळे सर यांनी दिला. महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथील १९८८-८९ शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी व शिक्षकांचा “सोहळा एकमेकांना नव्यानं भेटण्याचा” स्नेह मेळावा मोठ्या थाटात आणि उत्साहपुर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यावेळी तत्कालीन मुख्याध्यापक बी. के. मुळे हे अध्यक्ष स्थानावरुन उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होते.

यावेळी व्यासपिठावर जे. जे. कदम सर, एच. डी. भोसले सर, नरुटे सर, दत्तात्रय शेखदार सर, शेख मॅडम, धायगुडे सर, भगत सर, नारायणकर सर, नानासाहेब सावंत सर, कळसे सर, के. एस. चव्हाण सर आदी शिक्षक वृंद उपस्थित होता. तर त्यांच्यासमोर त्यांचे ३३ वर्षांपूर्वीचे विद्यार्थी तर सध्याचे डॉक्टर, वकील, अभियंता, साखर कारखान्याचे कार्यकारी रोटरीचे माजी अध्यक्ष, राजकीय पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शेतकरी, व्यावसायिक उपस्थित होते.

अकलुज येथील कृष्णप्रिया मल्टीफंक्शनल हॉलमध्ये पार पडलेल्या या अनोख्या सोहळ्यात महर्षि प्रशालेत शिक्षण घेणारे १०० मित्र-मैत्रीणी व त्यांचे नातेवाईक तब्बल ३३ वर्षांनी एकत्र आल्याने जुन्या आठवणींनी आणि शालेय गप्पांनी हॉल गजबजुन गेला होता. शाळा संपल्यानंतर पुढील शिक्षणासाठी एकमेकांपासुन दुरावल्यानंतर सर्वांना एकत्र आणण्याची मोठी जबाबदारी बबनराव शेंडगे यांनी कष्टाने पार पाडली.

यावेळी पुढे बोलताना मुख्याध्यापक बी. के. मुळे यांनी अनेकांचा कुटुंबासह परीचय सांगुन आपल्या तल्लख स्मरणशक्तीचे दर्शन घडविले. यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थी आहेत म्हणुन शिक्षक आहेत, शाळा आहेत. विद्यार्थ्यांना योग्य ज्ञान दान व्हावे म्हणून मी कडक धोरण अवलंबीले. शिक्षकांनीही आपल्या कर्तव्यात कधी कसर केली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जिवनात तुमच्या रुपाने सर्व विद्यार्थी यशस्वी झालेले पहायला मिळाले. तुम्ही कितीही मोठे झालात तरी माझे तुमच्यावर लक्ष राहणार असल्याचे सांगत वडीलकीच्या अधिकाराने आपल्या शब्दांनी सगळ्यांचे कान पिळले.

यावेळी तत्कालीन शिक्षक जे. जे. कदम यांनी चांगले विद्यार्थी घडणे हेच शिक्षकांचे यश असते. विद्यार्थ्यांनी हिमालयाची उंची गाठावी, हे आनंददायी असुन आपले सामर्थ्य अन् ऊर्जेचा उपयोगातुन उज्वल भविष्य घडते, असा सल्ला दिला. प्रत्येकाने येणाऱ्या क्षणाचा आनंद घेण्याची सकारात्मक मानसिकता ठेवावी. आपल्या मनात कधीही अहंकार आणि अभिमान जागा होवु देवु नका, असा मोलाचा संदेश दिला.

सेवानिवृत्त शिक्षक पोपट भोसले  यांनी विद्यार्थी किती मोठे झाले तरी ते खिडकीतून बाहेर पाहणारे अल्लड मुले आणि बोरे खावुन आटोळ्या टाकणाऱ्या खोडकर मुलीच असतात असे सांगुन सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ॲड. भारत गोरवे यांनी आपल्या शालेय जिवनातील आठवणी जागवल्या, तर आनंदनगरच्या माजी सरपंच मेघना राऊत-इनामके यांनी शालेय जिवनातील मैत्रीणीच्या गोड आठवणींना उजाळा दिला. यामध्ये मुलींनी केलेली धमाल आणि मिळालेल्या शिक्षा यावर गोड आठवणींचा लख्ख प्रकाश टाकला. या आनंदाच्या क्षणी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर जुन्या मैत्रीचा आनंद ओसंडुन वाहत होता. तर शाळेत केलेल्या गमतीजमती आणि सरांनी केलेली शिक्षा या गप्पांनी मन पुन्हा प्रफुल्लीत होत होते.

यावेळी आयोजकांनी उपस्थित गुरजनांचा आणि वर्ग मित्र-मैत्रीणींचा सन्मान केला. मुख्य कार्यक्रमानंतर स्नेहभोजन होवुन शेख मॅडम यांनी हिरवळीवर पुन्हा एकदा पन्नाशीतील विद्यार्थ्यांचा गाण्याचा तास घेतला. फनी गेम्सचा आनंद लुटत एकमेकांना पुन्हा नव्यानं भेटण्याचा संकल्प करीत ३३ वर्षानंतर एकत्र आलेले मित्र-मैत्रीणींनी आठवणींचे मखमली क्षण अनुभवाच्या शिदोरीत साठवुन परतीचा प्रवास धरला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबनराव शेंडगे, प्रवीण कारंडे, नवनाथ सावंत, जितेंद्र शिंदे, विजयकुमार पाटील, ॲड. भारत गोरवे, भागवत आवताडे, जितेंद्र चव्हाण यांनी परीश्रम घेतले.

सदर कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील आणि अक्कासाहेब यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. यावेळी प्रा. दादाहारी नवगिरे यांनी महर्षि गिताद्वारे सहकार महर्षि व अक्कासाहेब यांचे प्रती आदरभाव व्यक्त केला. तसेच आजपर्यंत स्वर्गवासी झालेले वर्ग मित्र समाजातील प्रतिष्ठित, सीमेवर शहीद झालेले जवान यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक रोटरीचे बबनराव शेंडगे यांनी केले तर, सुत्रसंचालन प्रा. श्री. गुजर यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार ॲड. प्रवीण कारंडे यांनी मानले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleराजेंद्र गुंड यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात स्वतःची ओळख व नावलौकिक कमावला – कवी बाबासाहेब लोंढे
Next articleजुनी पेंशन मागणीसाठी नागपूर विधानभवनावर लाखों कर्मचाऱ्यांचा धडकला मोर्चा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here