पंढरपूरच्या गाईसारखी मोहिते-पाटील यांच्या राजकीय खेळीला भाजपकडून लगाम, मोहिते पाटील भाजप पक्ष सोबत राहणार का मोहिते पाटील समर्थक गटासोबत राहणार ??
महाळुंग ( बारामती झटका )
माळशिरस तालुक्यातील महाळुंग श्रीपुर नगरपंचायतच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व आघाडी आमने सामने उभे आहेत. निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मोहिते पाटील गटाला दे धक्का दिलेला असल्याने माळशिरस तालुक्यात मोहिते पाटील गटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे.
माळशिरस तालुक्यातील नातेपुते, माळशिरस, महाळुंग नगरपंचायतीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदार संघाचे संघटन सरचिटणीस धैर्यशील मोहिते-पाटील यांची भाजपचे पक्ष निरीक्षक म्हणून नेमणूक केलेली होती. धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाळुंग नगरपंचायत हद्दीतील भाजपच्या नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक विधान परिषदेचे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वेळा घेतली होती. मोहिते पाटील समर्थक यांचे पाच गट कार्यरत आहेत. गटाचे एकमत न झाल्याने आपण स्वतंत्र आघाड्या करून लढाव्यात, अशा दबक्या आवाजात सूचना केलेल्या असाव्यात. पाचीही गटातील कोणालाच दुःखवायला नको, अशी मोहिते-पाटील यांची भूमिका असावी. निवडणुकीत कोणत्याही गटाचा उमेदवार विजयी झाल्यानंतर शिवरत्नवर सत्कार करण्यात यावा, अशी मोहिते-पाटील व मोहिते पाटील समर्थकांची सुप्त इच्छा असावी, अशी राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. ज्याप्रमाणे पंढरपूरमध्ये गाई दिवसभर चारा खाण्याकरता शहरात फिरत असतात मात्र, संध्याकाळी दूध देण्याकरता मालकांच्या वाड्यावर येत असतात त्याच धर्तीवर कोणत्याही गटातून निवडून येवून शिवरत्नवर मात्र सत्कार करा, असा सूर निघत होता. माळशिरस तालुक्यातील 14 गावे माढा लोकसभा मतदारसंघात येत आहेत. त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते व कार्यकर्ते भाजप प्रेमी आहेत. काही लोकांच्या मोहिते पाटील यांचा डाव लक्षात आल्यानंतर जिल्हा व प्रदेश पातळीवरून भारतीय जनता पार्टीचे निवडणुकीसाठी लागणारे बी फार्म उपलब्ध केले, याची कल्पना मोहिते पाटील व मोहिते पाटील समर्थक यांना नव्हती. अचानक सूत्रे हलली होती, त्यामुळे उर्वरित मोहिते पाटील गटात अस्वस्थता निर्माण झालेली आहे. मोहिते पाटील पक्षासोबत राहणार का ? मोहिते पाटील गटासोबत राहणार ?, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng