वर्धा येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर आणि मावळते अध्यक्ष भारत सासणे यांच्या उपस्थितीत संपन्न

मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सरकार प्रयत्न करेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

वर्धा (बारामती झटका)

विदर्भातील वर्धा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा उद्घाटन सोहळा आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यासमयी संमेलनाचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर तसेच मावळते अध्यक्ष भारत सासणे यांचा सन्मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी राज्यातील आणि राज्याबाहेरून खास या संमेलनासाठी जमलेल्या सारस्वतांचे स्वागत करून त्यांच्यासमोर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

बापूजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि विनोबा भावेंच्या विचारांनी पुलकित झालेल्या वर्धा नगरीत ९६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडत असून नरेंद्र चपळगावकर यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्यासाठी होकार दिला ही आनंदाची बाब असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना नमूद केले.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, मराठी भाषेतील साहित्यिकांचे योगदान कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा सोहळा आहे. मराठी भाषेचे प्रेमी दरवर्षी लाखोंच्या संख्येने एकत्रित येतात. भाषेवरचे प्रेम ही एक अद्भुतता आहे. मराठी भाषेचा हा चमत्कार आहे. कोणत्याही साहित्य संमेलनामध्ये राजकीय लोकांचा हस्तक्षेप कधीच नसतो. या ठिकाणचा आनंद वेगळा आणि साहित्यमय आहे. सामाजिक तळमळीतून साहित्य निर्माण होते. समाजकारणी, साहित्यिक, राजकारणी अशा सामाजिक तळमळीतूनच निर्माण होतात. या ठिकाणी अशा साहित्यिकांची मांदियाळी असल्याचे मत यासमयी व्यक्त केले.

सरकार काही चुकीचे काम करत असेल तर जरूर सुधारणा करण्यासाठी सारस्वतांचे मार्गदर्शन असणे तसेच त्यांच्या सुचना मान्य करणे आवश्यक आहे. याकरिता तेवढे खुले व मोठे मन असणे देखील तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे सरकारकडून काही चुकीचे घडल्यास कान धरण्याचा अधिकार तुम्हाला आहे असे यावेळी स्पष्ट केले. साहित्य क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन शासनाला आवश्यक असून त्यातून राज्यासाठी मोठे कार्य करण्यासाठी बळ मिळत असल्याचे याप्रसंगी अधोरेखित केले. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे या भागाचा विकास होणार असून साहित्यिकांनी हे बदल देखील नक्की टिपावेत, अशी अपेक्षा यासमयी बोलताना व्यक्त केली.

मराठी भाषेच्या समृद्धीसाठी सरकार प्रयत्न करेल असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. देशात आणि राज्यात अनेक प्रेरणादायी व्यक्तिमत्व होऊन गेली आहेत. त्यांचे प्रेरणादायी साहित्य आपल्या भाषेसोबतच अन्य भाषेत जावे. अन्य भाषेतील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांचे भाषांतर आपल्या भाषेत व्हावे, असे मतही याप्रसंगी व्यक्त केले.

महाराष्ट्र बाहेरील संस्थांना संमेलनाच्या आयोजनासाठी २५ लाख रुपये व वारकरी संमेलनाला २५ लाख देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. विदर्भातील कवी राजा बढे यांच्या ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या गीताला राज्य गीताचा दर्जा देण्यात आला आहे. तसेच साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांना राज्य अतिथीचा दर्जा देण्यात येईल अशी घोषणा यासमयी केली.

याप्रसंगी संमेलनाध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर, शालेय शिक्षण व मराठी भाषा विभाग मंत्री दीपक केसरकर, मावळते अध्यक्ष भारत सासणे, स्वागताध्यक्ष माजी खासदार दत्ता मेघे, साहित्य अकादमीचे माजी अध्यक्ष डॉ. विश्वनाथप्रसाद तिवारी, प्रसिद्ध हिंदी कवी डॉ. कुमार विश्वास तसेच डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार पंकज भोयर आणि साहित्य विश्वातील अनेक मान्यवर साहित्यिक व राज्यभरातून आलेले साहित्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Previous articleसारथी व एमकेसीएल तर्फे मराठा समाजासाठी संगणक पदविका कोर्स मोफत
Next articleएक चतुरस्त्र टायगर…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here