Uncategorized

चला पंढरीसी जाऊ | जीवीच्या जिवलगा पाहू – ह. भ. प. श्रीराम महाराज भगत, नातेपुतेकर

नातेपुते (बारामती झटका)

आषाढाची चाहूल लागली की वारकऱ्याची अवस्था माझ्या जिवीची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी | पांडुरंगी मन रंगले !! खांद्यावर भगवी पताका घेत मुखात श्री विठ्ठलाचे नाम आणि ‘ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माउली तुकाराम’ असा जयघोष करत विठ्ठल भक्तीचा चैतन्य सोहळा सुरु होतो. ‘माऊली माऊली’ उच्चारणाने मनःशांतीचा लाभ होतो.

पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे लाभलेले सांस्कृतिक ऐश्वर्य आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून व इतरही राज्यातून भाविक वारकरी वारीमध्ये सहभागी होतात. वातावरणात चैतन्य निर्माण होते आ​णि प्रत्येक भाविकाला वेध लागतात ते पंढरपूरचे. डोळ्यांपुढे विठूमाऊलींची मूर्ती उभी राहते अन् पाय आपोआप वारीच्या मार्गाकडे वळतात. पालखी प्रस्थान त्याआधीच वारकरी आपल्या गावातून रवाना झालेले असतात. पिढ्यानपिढ्या वारीत जाण्याची परंपरा आहे. लाखो विठ्ठलभक्त पंढरीचे विठ्ठल दर्शन हाच त्यांच्यासाठी वर्षातील सर्वोच्च सण आणि परमानंदाचा क्षण मानतात. वारीच्या दिवसांत संसाराच्या सुखदुःखाच्या गोष्टींना विसरत, संसार आणि व्यवहाराची काळजी गुंडाळून ठेवत हे भाविक पंढरीची वाट धरतात.

हा आनंदाचा सोहळा काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. म्हणजे दि.१० जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा प्रस्थान व दि. ११ जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रस्थान होणार असून महाराष्ट्रातील सर्व संतांच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान वेळापत्रक जाहीर झाले आहे. संतांनी घालून दिलेला हा परिपाठ पिढ्यान् पिढ्या सांभाळणे सोपे नाही. त्यासाठी दोन महिन्याआधी वारीची तयारी केली जाते. कुटुंबातील किती जणांनी अन् कुणी वारीला जावे, यासाठी प्रेमळ चढाओढ लागते. एकदा निर्णय झाला, की तयारी सुरू होते. थोतांड, कर्मकांड आणि भाकड गोष्टींपासून दूर राहण्याची शिकवण जोपासणारा वारकरी भाविक ‘पंढरीची वारी आहे माझे घरी।आणिक न करी तिर्थव्रत, असे सात्विक अभिमानाने सांगत वारीला निघतो. सकळांशी येथे आहे अधिकार । कलियुगी उध्दार हरिच्या नामे ॥ अशी तळ गडगळ साधी, सोपी आणि सरळ भक्तीची शिकवण देणाऱ्या भाविक वारकऱ्यांना वारी म्हणजे आयुष्याचे सार्थक करणारा सोहळा आणि साधना.

एर्हवी वारकरी लौकीक गोष्टीला कधीही महत्व देत नाही. ‘तुका म्हणे नको वरपंग देवा । घ्यावी माझी सेवा भाव शुध्द ॥ असा दंडक असणाऱ्या भाविक वारकऱ्याला अंतकरणपूर्वक विठ्ठलाची भक्त करणेच आवडते. आषाढी कार्तिक पंढरीची वारी । साधन निर्धारी आण नाही ॥’, असा वारकरी भक्ताचा ठाम निर्धार असतो. वारकरी भाविक पायी वारीला मोक्षाचा मार्ग समजतात. ‘पंढरीचे वारकरी । ते अधिकारी मोक्षाचे ॥ याचाच अर्थ वारी म्हणजेच मोक्ष. मानवी जीवनात परमपुरुषार्थ प्राप्त करावा अशी सर्वांचीच इच्छा असते. तो वारकरी भक्ताला वारीत दिसतो, भेटतो आणि याची देही याची डोळा अनुभवण्यास मिळतो.

पंढरपूरच्या वारीतला आनंद हा सुखसोहळा स्वर्गी नाही, अशाच स्वरुपाचा असतो. गात जागा, गात जागा । प्रेम मागा विठ्ठला ॥, असे भजन म्हणत वारकरी पंढरीच्या दिशेने चालत राहतो. वारकऱ्यांच्या भजनात सात्विकता तर असतेच शिवाय प्रबोधनही असते. हरिनाम, अभंग गायन, नामस्मरण, भजनाच्या वारकरी चाली, नाद पावले यामध्ये वारकरी भाविक आनंदमय होऊन जातो. ताल आणि तोल या दोन्हीतही वारकरी पक्का असतो. निष्काम भक्तीचे प्रतिक म्हणजे वारकरी. म्हणून लाखो भाविक लोक एकत्र येऊन पायी वारी करतात तेव्हा ती एक चळवळ असते, यातून परिवर्तन घडते, सुसंस्काराचे आदान प्रदान घडत असते. अतिरेक विचार नष्ट होतात. समाजामध्ये एकोपा निर्माण होतो. प्रत्येकाने एकदा तरी वारी केली पाहिजे आणि वारकरी म्हणून सहभागी झाले पाहिजे, मग खरा आनंद काय असतो ते कळते‌. वारी हा देखावा नसून तो एक जीवनातील आनंदाचा संस्कार सोहळा आहे. हेची व्हावी माझी आस । जन्मोजन्मी तुझा दास ।। पंढरीचा वारकरी । वारी चुको नेदी हरी।।

ह.भ.प. श्रीराम महाराज भगत, नातेपुते, ता. माळशिरस.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

hendek Escort escort serdivan Eskişehir bayan escort