उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजित पवार यांनी केली ‘र्व्हच्यूअल रिॲलिटी रोड सेफ्टी टॅब लॅब’ ची पाहणी

‘र्व्हच्यूअल रिॲलिटी रोड सेफ्टी टॅब लॅब’मुळे रस्ते अपघातामध्ये घट होण्यास उपयुक्त – उपमुख्यमंत्री
बारामती (बारामती झटका)
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘र्व्हच्यूअल रिॲलिटी रोड सेफ्टी टॅब लॅब’ आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे; रस्ते अपघातामध्ये घट होण्यास हा उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, अशा विश्वास राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रावहिनी अजित पवार यांनी व्यक्त केला.
रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूमध्ये मोठ्या प्रमाणात घट करण्यासोबतच त्यांच्यामध्ये वाहतूक नियमांविषयी प्रभावीपणे जनजागृती करण्याच्या उद्देशाने भारत केअर्सच्या माध्यमातून उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे उभारण्यात आलेल्या ‘र्व्हच्यूअल रिॲलिटी रोड सेफ्टी टॅब लॅब’ला दिलेल्या भेटीप्रसगी त्या बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्ष सचिन सातव, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता दिगंबर डुबल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम, तहसीलदार स्वप्नील रावडे, भारत केअर्सचे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक राहूल अष्टेकर आदी उपस्थित होते.

श्रीमती पवार यांनी या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वाहनचालकांना सुरक्षित वाहनचालन, वाहतूक नियम, अपघातांची कारणे व त्यावरील प्रतिबंधात्मक उपायाबाबत दिले जाणारे प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. वाहनचालक, विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांना रस्ता सुरक्षेबाबत जागरूक करण्याच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुकही श्रीमती पवार यांनी केले.
त्या पुढे म्हणाल्या, नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणे, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा तसेच चारचाकी वाहनचालकांनी सीटबेल्टचा नियमित वापर करणे, वेगमर्यादेचे पालन करणे व वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळणे, हा प्रत्येक नागरिकाचा सामाजिक दायित्वाचा भाग आहे. रस्ते अपघातांमध्ये प्रभावी घट करण्यासाठी शासन, प्रशासन आणि नागरिक यांनी सामूहिक जबाबदारीने कार्य करणे आवश्यक आहे. राज्यातील पहिली प्रयोगशाळा बारामती येथे सुरु करण्यात आली असून या माध्यमातून रस्ते सुरक्षा विषयक नियमांचे पालन होण्यास मदत होणार आहे, असेही श्रीमती पवार म्हणाल्या.

‘र्व्हच्यूअल रिॲलिटी रोड सेफ्टी टॅब लॅब’ बाबत माहिती देताना श्री. निकम म्हणाले, भारत केअर्स संस्थेमार्फत देशभरात राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे विशेषतः युवक, विद्यार्थी, व्यावसायिक वाहनचालक तसेच सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवातून रस्ता सुरक्षेचे महत्त्व समजण्यासाठी मदत होत आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, बारामती येथे कार्यरत असलेली ही लॅब रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी प्रभावी माध्यम ठरत आहे, असेही श्री. निकम म्हणाले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



