यशस्वीतेसाठी शिक्षकांच्या ज्ञानाएवढेच आई-वडीलांचे संस्कारही खूप महत्त्वाचे – जिल्हा उपनिबंधक नितेश कदम

विठ्ठलवाडी येथे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार
माढा (बारामती झटका)
आजच्या भयंकर स्पर्धेच्या युगात उच्च ध्येयप्राप्ती करणे सहजसाध्य नाही यासाठी शिक्षकांनी केलेले योग्य मार्गदर्शन व ज्ञानाएवढेच आई-वडीलांचे संस्कारही खूप महत्त्वाचे आहेत तसेच संबंधिताचे प्रामाणिक प्रयत्न, जिद्द व चिकाटी यशस्वीतेसाठी उपयुक्त ठरते असे प्रतिपादन पुण्याचे जिल्हा उपनिबंधक नितेश कदम यांनी केले आहे. ते विठ्ठलवाडी, ता. माढा येथे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करताना बोलत होते.
यावेळी स्पर्धा परीक्षेतून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत निवड झाल्याबद्दल रोहिणी कदम, आळंदी ते पंढरपूर आषाढी वारी सोहळा सलग तिसऱ्या वर्षी पायी पूर्ण केल्याबद्दल सत्यवान थोरात व सुरेखा थोरात या दाम्पत्याचा, दैनिक पुण्यनगरी समूहाचा जिल्हास्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल राजेंद्र गुंड यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी देवडीचे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख सत्यवान थोरात यांनी सांगितले की, विठ्ठलवाडी हे गाव शासकीय अधिकारी व नोकरदारांचे गाव म्हणून ओळखले जाते. या गावातील दर्जेदार शिक्षण व आई-वडीलांचा कृतियुक्त आदर्श खूपच महत्वाचा व प्रेरणादायी आहे.मुलांप्रमाणेच या गावातील मुलींचे स्पर्धा परीक्षेतील यशस्वीतेचे प्रमाण कौतुकास्पद आहे.मागील तीन वर्षांपासून सपत्नीक आषाढी वारीचा सोहळा आळंदी ते पंढरपूर पायी पूर्ण केल्याने आत्मिक समाधान लाभल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक बाळू गुंड, माजी सरपंच भागवत चौगुले, लेखापरीक्षक सुहास शिंगाडे, आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड, नेताजी कदम, प्रविण खुर्द, इंदूमती कदम, सुरेखा थोरात, शांताबाई गुंड, मेघना गुंड, ज्योती शिंगाडे, सुरेश खुर्द, सुभद्रा खुर्द, दिपाली खुर्द, विकास खैरे, ज्ञानेश्वर तरंगे, मेघश्री गुंड, रिद्धी खुर्द यांच्यासह ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



