ताज्या बातम्यासामाजिक

करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाच्या भावनेतून संत निरंकारी मिशनचे रक्तदान

संत निरंकारी मिशनतर्फे वारजे ब्रँच येथे आयोजित रक्तदान शिबिरात २३६ युनिट रक्त संकलित

वारजे (बारामती झटका)

करुणा, प्रेम आणि सह-अस्तित्वाची भावना जेव्हा मानवी जीवनात जागृत होते, तेव्हा व्यक्ती स्वतःच्या स्वार्थाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाचे प्रभावी माध्यम बनते. निरंकारी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या प्रेरणेतून परोपकार, करुणा आणि मानवसेवेच्या उदात्त भावनेने संत निरंकारी मिशनतर्फे दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी वारजे, शिवणे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात २३६ युनिट रक्ताचे संकलन करण्यात आले. निरंकारी रक्तपेढी तसेच ससून रुग्णालय रक्तपेढीच्या अनुभवी डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्यांनी रक्तदात्यांची आवश्यक वैद्यकीय तपासणी करून सुरक्षित, शिस्तबद्ध पद्धतीने रक्तदान प्रक्रिया पूर्ण केली.

संपूर्ण आयोजनामध्ये स्वच्छता, सुरक्षितता, नियोजन आणि सेवाभाव यांना विशेष प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे हा उपक्रम केवळ रक्तदानापुरता मर्यादित न राहता मानवता, करुणा आणि सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रेरणादायी उदाहरण ठरला.

शिबिराचे उद्घाटन मिशनच्या पुणे सिटी सेक्टर प्रमुख पुष्पा करमचंदनी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी क्षेत्रीय संचालक अवनित तावरे, अशोक कोऱ्हाळे त्याचबरोबर अनेक नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व मान्यवरांनी शिबिरास सदिच्छा भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या समाजोपयोगी कार्याचे मनापासून कौतुक केले.

विशेष म्हणजे, संत निरंकारी मिशनची रक्तदानाची ही पवित्र सेवा-परंपरा गेल्या चार दशकांहून अधिक काळ अखंडपणे सुरू आहे. आतापर्यंत देशभरात होणाऱ्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून सुमारे १५,००,००० पेक्षा जास्त युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मानवसेवेसाठी मिशनची अटळ बांधिलकी यामधून अधोरेखित होते.

युगप्रवर्तक बाबा गुरबचन सिंहजी यांनी सत्य, साधेपणा आणि सद्भावनेचा मार्ग दाखवत तरुणांना नशामुक्त जीवनाचा स्वीकार करून आपली शक्ती समाजसेवेसाठी अर्पण करण्याचे आवाहन केले. त्यानंतर बाबा हरदेव सिंह जी महाराज यांनी “रक्त नाड्यांतून वाहावे, नाल्यांतून नव्हे” हा प्रेरणादायी संदेश देत रक्तदानाला जनआंदोलनाचे स्वरूप दिले. हाच मानवसेवेचा संदेश आजही सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावीपणे पुढे नेला जात आहे.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, रक्तदाते, स्वयंसेवक, वैद्यकीय अधिकारी तसेच या उपक्रमाच्या आयोजनासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या सर्वांचे श्री. विजय कदम यांनी मनःपूर्वक आभार मानले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button