झेडपी समाज कल्याणचे बांगर अडचणीत; उमेश पाटलांच्या पत्रावर सीईओ यांना चौकशी करण्याचे आदेश
सोलापूर (बारामती झटका)
सोलापूर जिल्हा परिषदेतील समाजकल्याण विभागातल्या दिव्यांग विभाग पाहणारे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता सचिन सच्चिदानंद बांगर यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख प्रवक्ते उमेश पाटील यांच्या तक्रारीनंतर सच्चिदानंद बांगर यांची चौकशी करून अहवाल सादर करण्याची सूचना दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या आहेत. उमेश पाटील यांनी केलेल्या तक्रारीमध्ये, सच्चिदानंद बांगर हे समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद सोलापूर येथे वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता म्हणून गेल्या ६ वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांना चुकीची व बेकायदेशीर कामे करण्याची सवय झालेली आहे. त्यामुळे दिव्यांगाच्या चांगल्या काम करणा-या संस्था व कर्मचारी यांना त्यांच्यामुळे त्रास होत आहे. दिव्यांग संस्थांना अनुदान व दिव्यांग शाळेतील कर्मचा-यांना वेतनासाठी निधी उपलब्ध असताना वेळेत पगार करत नाहीत. तसेच वेतन फरक व थकीत वेतन काढण्यासाठी टक्केवारी घेतात.
तसेच सोलापूर जिल्ह्यातील एका अंध शाळेत २०१६ पासून रिक्त असलेल्या शिक्षक या पदाबाबत जिल्हा समाज कल्याण अधिकारी सोलापूर यांच्या कार्यालयाकडून वेळोवेळी पद रिक्त असले बाबतची माहिती आयुक्त दिव्यांग कल्याण पुणे यांना माहे मार्च २०२२ डिसेंबर २०२३ अन्वये पाठविलेली आहे. असे असताना बांगर यांनी सदर पदाबाबत मागील २०१८ मधील बोगस नाहरकत पत्र व २०१६ पासून मान्यता दाखवून माहे मार्च एप्रिल २०२४ या दोन महिन्याचे वेतन काढलेले आहे. त्या कर्मचा-यांना २०१८ मध्ये मान्यता असल्यास तब्बल सहा वर्षानंतर वेतन काढण्याचे प्रयोजन काय ? हा प्रश्न निर्माण होतो. या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करून चुकीच्या पध्दतीने वेतन काढले आहे. यामध्ये शासनाची आर्थिक फसवणूक केलेली आहे. हे प्रकरण मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. सोलापूर यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी हे प्रकरण चौकशी करण्यासाठी प्रादेशिक उपआयुक्त समाज कल्याण पुणे यांच्याकडे अहवाल पाठविलेला आहे. सदर बाब गंभीर आहे.
या तक्रारीनंतर दिव्यांग कल्याण आयुक्त प्रवीण पुरी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना तीन ऑगस्ट रोजी पत्र पाठवून सच्चिदानंद बांगर, वैद्यकिय सामाजिक कार्यकर्ता, जिल्हा परिषद, सोलापूर येथे ६ वर्षापासून कार्यरत असून त्यांनी दिव्यांगांच्या विशेष शाळांच्या कामकाजामध्ये अनियमितता केलेली असून त्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करणेबाबत विनंती केलेली आहे.
त्याअनुषंगाने आपणांस कळविण्यात येते की, संदर्भिय तक्रार निवेदनामध्ये नमूद केलेल्या मुद्यांच्या अनुषंगाने आपण आपल्या स्तरावरून सविस्तर चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आपल्या अभिप्रायासह या आयुक्तालयास सादर करावा अशा सूचना केल्या आहेत.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.