माळशिरस पंचायत समितीची आरक्षण सोडत गुरुवारी पंचायत समितीच्या सभागृहात होणार – तहसिलदार जगदीश निंबाळकर.
गुरुवारी माळशिरसचा बाजार, योगायोगाने आरक्षणाची सोडत गुरुवारी, त्यामुळे कोणाचा बाजार बसणार ? आणि कोणाचा बाजार उठणार ?
माळशिरस ( बारामती झटका )
राज्य निवडणूक आयोगाकडील दि. 9 मे 2022 रोजीच्या आदेशामधील तरतुदीनुसार माळशिरस पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत माळशिरस पंचायत समिती सभागृहात गुरुवार दि. 28 जुलै 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी यांचेकडून पर्यवेक्षण अधिकारी म्हणून श्री. नागेश पाटील, भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांची नेमणूक करण्यात आलेली आहे, अशी माहिती तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी दिली. यावेळी निवासी नायब तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप उपस्थित होते.
आरक्षण सोडत काढत असताना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या सन 2002 पासूनच्या आरक्षणाचा विचार करण्यात येणार आहे. तसेच जरी सद्यस्थितीत नव्याने गट आणि गण रचना झालेली असली तरी, पूर्वीचे आरक्षण काढताना दि. 9 मे 2022 रोजीच्या आदेशातील तरतुदीनुसार आत्ताच्या गणातील किंवा गटातील 50 टक्के अथवा 50 टक्के पेक्षा जास्त लोकसंख्या कोणत्या प्रवर्गासाठी संबंधित वर्षी आरक्षित होती, त्याचा विचार करण्यात येणार आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/07/WhatsApp-Image-2022-06-20-at-5.20.17-PM-1024x819-2.jpeg)
अनुसूचित जातीसाठी तालुक्यातील ग्रामीण लोकसंख्येच्या टक्केवारीनुसार मतदारसंघ राखीव ठेवण्यात येणार आहे. माळशिरस पंचायत समितीचे 22 गण आहेत, त्यापैकी चार अनुसूचित जातीसाठी राखीव असतील. 5 ओबीसी साठी राखीव असतील, उर्वरित 13 गण सर्वसाधारणसाठी खुले राहतील. तरी लोकप्रतिनिधी व इच्छुक यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तहसीलदार जगदीश निंबाळकर यांनी केलेले आहे.
जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण रचना झाल्यापासून अनेक इच्छुक गुडघ्याला बाशिंग लावून बसलेले आहेत. आरक्षणानंतर गुडग्याची बाशिंगे आपोआप घोट्याला येण्याची शक्यता आहे तर, काहींची बाशिंगे दुसऱ्याच्या कपाळाला जाऊन बसण्याची शक्यता आहे. गुरुवारी आरक्षण सोडत आहे. माळशिरसचा बाजार गुरुवारी असतो. आरक्षणामध्ये कोणाचा बाजार बसतो आणि कोणाचा बाजार उठतो, हे पाहणे गरजेचे आहे.
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/07/Screenshot_2022_0714_213451-1.png)
जिल्हा परिषद गटाचे आरक्षण जिल्हाधिकारी सोलापूर येथे घेणार आहेत. त्यामध्ये 77 जिल्हा परिषद गट आहेत, त्यापैकी 12 अनुसूचित जाती व 1 अनुसूचित जमाती आरक्षित राहणार आहे. ओबीसी म्हणजेच नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी 20 जागा आरक्षित राहतील. उर्वरित 44 जागा सर्वसाधारण असणार आहेत. सर्वच जागेमध्ये महिलांचे 50% आरक्षण राहणार आहे.
नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng
![](https://baramatizatka.com/wp-content/uploads/2022/07/Screenshot_2022_0707_163608-1.png)