माळशिरस तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रासाठी अधिकाऱ्यांकडून पाहणी

चौदाशे एकर क्षेत्रावर उभारणार औद्योगिक वसाहत, मा. आ. राम सातपुते आणि रणजितसिंह शिंदे यांच्या प्रयत्नाला यश
महाळुंग (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यातील श्रीपूर मळा परिसरात औद्योगिक क्षेत्र एमआयडीसी स्थापन करण्याच्या दृष्टीने शासनाच्या वतीने पहिला शासकीय सर्वे करण्यात आला. माळशिरस तालुक्यातील शेती महामंडळाच्या जमिनीवर औद्योगिक विकासाची शक्यता तपासणीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून प्राथमिक अहवाल तयार केला आहे.
माळशिरस तालुक्याचे माजी आमदार राम सातपुते तसेच सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे आणि माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या पदाधिकाऱ्यांनी औद्योगिक मंत्री यांच्याकडे श्रीपूर मळा येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत पाठपुरावा केला होता. त्यानुसार औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी दौरा केला. या पाहणीमध्ये एमआयडीसी सोलापूरचे प्रादेशिक अधिकारी शिवाजी राठोड, उपअभियंता प्रदीप खंदारे, प्रमुख मापक सारंग साबळे, भारत भांजी तसेच शेती महामंडळाचे अकाउंटंट राजेंद्र काशीद यांनी सहभाग घेतला. अधिकाऱ्यांनी महाळुंग, श्रीपूर, बोरगांव, जांभूड व मीरे परिसरातील शेती महामंडळाच्या गटावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली.
डी १९ रोड लगत बोरगाव व श्रीपूर हद्दीत सुमारे ३०० एकर क्षेत्रासह महाळुंग व जांभुड परिसरातील सुमारे ८०० एकर क्षेत्राची पाहणी करण्यात आली. माळशिरस चेंबर ऑफ कॉमर्स कडून शासनाला पाठवण्यात आलेल्या पत्रात महाळुंग येथील ३४८.५५ हेक्टर, जांभूड येथील त १३८.६७ व बोरगाव येथील ६९.३२ हेक्टर असे एकूण ५५६.५४ हेक्टर क्षेत्र एमआयडीसीसाठी मागणी करण्यात आलेले आहे.
या प्रस्तावामध्ये औद्योगिक पार्क, इंजिनिग हब व लॉजिस्टिक पार्क विकसित करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भांत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ सोलापूर यांनी ४ मे रोजी माळशिरस तहसीलदारांना पत्र देखील पाठवले आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



