10/70 झोपडपट्टीतील रहिवाशांचे अतिक्रमण नियमांकूल करून नियमित करावे व घरकुलाचा लाभ द्यावा – भाजपा नगरसेवक महेश शिंदे आक्रमक

अकलूज (बारामती झटका)
अकलूज नगर परिषद हद्दीतील 10/70 झोपडपट्टी परिसरात अनेक कुटुंबे 1 जानेवारी 2011 पूर्वीपासून वास्तव्यास आहेत. मात्र, आजपर्यंत त्या नागरिकांच्या नावावर जागेची कायदेशीर नोंद करण्यात आलेली नाही. तसेच त्यांना घरकुल योजनांचा लाभही मिळालेला नाही.
या संदर्भात भाजपा नगरसेवक, शहराध्यक्ष तथा युवा मोर्चा पदाधिकारी महेश केशव शिंदे यांनी दि. 13 फेब्रुवारी रोजी अकलूज नगर परिषद प्रशासनास अधिकृत निवेदन देऊन 2011 पूर्वीपासून राहत असलेल्या सर्व पात्र कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांच्या नावावर जागा कायदेशीर करण्यात यावी. तसेच त्यांना शासनाच्या घरकुल योजनांचा तात्काळ लाभ देण्यात यावा, अशी ठाम मागणी केली होती.
महाराष्ट्र शासन, गृहनिर्माण विभागाच्या दि. 16 मे 2018 च्या शासन निर्णयानुसार (GR) 1 जानेवारी 2011 पूर्वी अस्तित्वात असलेल्या झोपडपट्ट्यांतील पात्र रहिवाशांना संरक्षण देणे व त्यांचे नियमितीकरण/पुनर्वसन करण्याबाबत स्पष्ट धोरण निश्चित करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम 1971 मधील तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांना अशा पात्र झोपडपट्टीधारकांना कायदेशीर संरक्षण देण्याचे अधिकार आहेत.
“ही केवळ जागेची नव्हे तर गोरगरीब जनतेच्या सन्मानाची लढाई आहे. शासनाचा स्पष्ट जीआर असताना प्रशासनाने विलंब करू नये. 10/70 झोपडपट्टीतील पात्र कुटुंबांना तात्काळ न्याय न मिळाल्यास आम्ही लोकशाही मार्गाने आक्रमक भूमिका घेऊ,” असा इशारा महेश शिंदे यांनी दिला.
गरीब व वंचित कुटुंबांना त्यांचा हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी हा लढा अखेरपर्यंत सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



