माळेवाडी प्रभाग क्र. १३ मध्ये पाणी समस्येवर तोडगा

नगरसेविका जयश्री एकतपुरे यांचा पुढाकार
अकलूज (बारामती झटका)
अकलूज (माळेवाडी) प्रभाग क्र. १३ मधील वाड्या-वस्त्यांमध्ये अनेक दिवसांपासून भेडसावत असलेली पाणीटंचाईची समस्या अखेर मार्गी लागली आहे. नगरसेविका जयश्री एकतपुरे यांनी संबंधित यंत्रणेशी सातत्याने पाठपुरावा करून आणि प्रत्यक्ष ठिकाणी उपस्थित राहून कामे पूर्ण करून घेतल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
प्रभागातील काही भागांत पाईपलाईनमध्ये अडथळे निर्माण झाल्याने तसेच पाण्याचा दाब कमी झाल्याने नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नव्हते. ही बाब लक्षात घेऊन जयश्री एकतपुरे यांनी तातडीने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला. संबंधित अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पाईपलाईन टाकणे, गळती दुरुस्ती व आवश्यक ते तांत्रिक बदल करण्यात आले. कामाच्या वेळी त्यांनी स्वतः उपस्थित राहून पाहणी केली. स्थानिक नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. यामुळे वाड्या-वस्त्यांतील पाणीपुरवठा सुरळीत झाला असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
“नागरिकांची मूलभूत गरज म्हणजे पाणी. प्रभागातील प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ व नियमित पाणी पोहोचावे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे मत नगरसेविका जयश्री एकतपुरे यांनी व्यक्त केले. या कामामुळे प्रभागातील महिलांना व ज्येष्ठ नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून स्थानिकांनी नगरसेविकेचे आभार मानले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



