एमआयटीमध्ये करिअर मार्गदर्शन व एनडीए अॅकॅडमीचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

पंढरपूर (बारामती झटका)
वाखरी येथील एमआयटी विश्वशांती गुरुकुल कॅम्पसमध्ये एमआयटी ज्युनिअर कॉलेजच्या एनडीए अकॅडमीचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आयोजित दहावीनंतरचे करिअर विषयक चर्चासत्रात प्रसिद्ध शिक्षणतज्ञ व करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर व कर्नल डी. के. उपाध्याय यांनी करिअरच्या विविध पर्यायांविषयी आणि संरक्षण क्षेत्रातील करिअरविषयी विशेष मार्गदर्शन केले. ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना योग्य करिअरची दिशा मिळावी तसेच देशसेवेबरोबरच संरक्षण क्षेत्रातील उच्च करिअरच्या संधी याविषयी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे विवेक वेलणकर, वाखरी येथील एमआयटी शैक्षणिक संकुलाचे सहसंचालक कर्नल डी. के. उपाध्याय, विश्वशांती गुरुकुलचे मुख्याध्यापक शिवाजी गवळी, ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य डॉ. स्वप्नील शेठ, हेडमिस्ट्रेस शिबानी बॅनर्जी व ज्युनिअर कॉलेजचे ग्रुप मार्केटिंग व्यवस्थापक योगेश नागपाल उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्वप्नील शेठ यांनी केले. यावेळी त्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात करिअर निवडताना तज्ज्ञ मार्गदर्शनाचे महत्त्व अधोरेखित करत कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. एमआयटी ज्युनिअर कॉलेजमध्ये सुरु झालेल्या एनडीए अकॅडमीमुळे पंढरपूर, सोलापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थ्यांना संरक्षण क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी सक्षम व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर कर्नल डी. के. उपाध्याय यांनी संरक्षण दलातील आर्मी, नेव्ही व एअरफोर्स अशा तिन्ही विभागातील करिअर संधी आणि देशसेवेबरोबरच मिळणाऱ्या सुविधा व मानसन्मान याविषयी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी NDA मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी आवश्यक असलेली शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक तयारी आणि नेतृत्वगुण यांचा विशेष उल्लेख केला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संरक्षण क्षेत्राबद्दल आकर्षण अधिक दृढ झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विवेक वेलणकर यांनी विद्यार्थ्यांना करिअर निवडताना केवळ पारंपरिक पर्यायांचा विचार न करता आपल्या आवडी, क्षमता, कौशल्ये आणि बदलत्या काळाच्या गरजा लक्षात घेऊन करिअर निवडण्याचा सल्ला दिला. यावेळी त्यांनी NDA प्रवेश प्रक्रिया, लेखी परीक्षा, SSB मुलाखत आणि प्रशिक्षण याविषयी त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. पुढे बोलताना ते म्हणाले ‘जर आपल्यामध्ये शिस्त, आत्मविश्वास, कठोर परिश्रम करण्याची तयारी असेल तर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होऊ शकता.’ यावेळी त्यांनी अभियांत्रिकी, वैद्यकीय, संरक्षण, विविध प्रवेश आणि स्पर्धा परीक्षांची तयारी विषयी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी व पालकांनी उपस्थित केलेल्या करिअरविषयक विविध प्रश्नांची उत्तरे त्यांनी संवादात्मक सत्रात दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राची बिडवे यांनी केले, नारायण देशपांडे व तानाजी डुबल यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली तर वीरेंद्र बावस्कर यांनी आभार प्रदर्शन केले.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



