ताज्या बातम्यासामाजिक

तरूण अधिकाऱ्याला तब्बल ५० हजार लाच घेताना एसीबीने रंगेहाथ पकडले

जत (बारामती झटका)

जत नगरपरिषदेतील कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रवीण रंगराव बाबर यांना ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने पकडले. याबाबत जत पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या कारवाईमुळे जत नगरपरिषद परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, तक्रारदाराचा फोटो स्टुडिओचा व्यवसाय असून, २०२५ मधील जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेसाठी फोटो व व्हिडिओ शूटिंगचे काम त्यांनी केले होते. संबंधित बिलाच्या मोबदल्यासाठी कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी प्रवीण बाबर यांनी ७५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.

पडताळणीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तडजोडीनंतर ५० हजार रुपये स्वीकारण्याचे निश्चित झाले. त्यानुसार आज जत येथील स्टुडिओमध्ये तक्रारदाराकडून पैसे घेताना बाबर याला रंगेहाथ पकडले.

या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सांगलीचे पोलिस उपअधीक्षक यास्मीन इनामदार यांच्या नेतृत्वाखाली पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण, पोलिस अंमलदार प्रीतम चौगुले आदी सहभागी झाले होते. अधिक तपास पोलिस निरीक्षक योगेश चव्हाण हे करत आहेत.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button