ताज्या बातम्यासामाजिक

मळोलीतील जाधव कुटुंबीयांचा पर्यावरणपूरक उपक्रम; वारकरी परंपरेतून समाजासमोर आदर्श

मळोली (बारामती झटका)

मळोली, ता. माळशिरस येथील निवृत्त मुख्याध्यापक तथा समाजात आदराचे स्थान असलेले मा. चांगदेव सोपान जाधव यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. परंपरेनुसार रक्षा नदीत विसर्जित करण्याऐवजी ती त्यांच्या आवडत्या शेतात विसर्जित करण्यात आली. तसेच त्या ठिकाणी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

जाधव सरांना शेती व वृक्षसंवर्धनाची विशेष आवड होती. त्यांची आठवण चिरंतन राहावी आणि पर्यावरणाचे जतन व्हावे या दुहेरी उद्देशाने त्यांची मुले कीर्ती जाधव – शिंदे व संदीप जाधव तसेच जाधव कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला.

पिढ्यानपिढ्या वारकरी संप्रदायाचे संस्कार जपणाऱ्या जाधव कुटुंबीयांनी पर्यावरणाचा विचार करून राबविलेला हा उपक्रम परिसरात कौतुकाचा विषय ठरला आहे. मृत्यूनंतरही निसर्गाशी नाते जपण्याचा आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला आहे.

“रक्षा मातीत मिसळली, आणि त्यातून उगवेल जीवन देणारा वृक्ष” हा संदेश या उपक्रमातून समाजासमोर ठेवण्यात आला आहे. “माणूस जातो, पण त्याच्या स्मृती वृक्षांच्या रूपाने पिढ्यानपिढ्या जिवंत राहतात.”

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button