ताज्या बातम्यासामाजिक

मल्हार साखर कारखान्याचे चेअरमन काशिनाथ देवकाते पाटील यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा; वृक्षारोपण आणि रक्तदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद

“समाजाचे काहीतरी देणे लागतो” या भावनेने कारखान्याची निर्मिती; शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी जीवन समर्पित

माळशिरस (बारामती झटका)

मल्हार साखर कारखाना लिमिटेड, चांदापुरी ता. माळशिरस चे चेअरमन श्री. काशिनाथ किसन देवकाते पाटील यांचा वाढदिवस यंदा सामाजिक उपक्रमांनी आणि उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.

कारखाना स्थळावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. त्याचबरोबर “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या संकल्पनेतून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला कारखान्याचे कर्मचारी, ठेकेदार आणि शेतकरी बांधवांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून उदंड प्रतिसाद दिला.

काशीच्या पाण्यापासून ते शेतकऱ्यांच्या सेवापर्यंतचा प्रवास
देवकाते पाटील कुटुंबात पुत्ररत्न जन्माला आल्यानंतर श्री काशीविश्वेश्वर येथील पाण्याने त्यांची आंघोळ घातली होती. त्यामुळे त्यांना “काशिनाथ” हे नाव मिळाले. लहानपणापासूनच हुशार आणि खेळकर असलेल्या काशिनाथ यांच्या अंगी मोठे काहीतरी करण्याची जिद्द होती.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना शेतकऱ्यांची सेवा करण्याची संधी म्हणून जलसंपदा विभागात नोकरी मिळाली. या काळात त्यांनी आपल्या पदाचा उपयोग करून अनेक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाण्याच्या अडचणी सोडवल्या आणि त्यांचे जीवनमान उंचावले. वयोमानानुसार ते कार्यकारी अभियंता पदावरून सेवानिवृत्त झाले.

नोकरीच्या काळातच माळशिरस तालुक्याचे ज्येष्ठ नेते स्व. शिवाजीराव पाटील उर्फ भाऊ यांच्या ज्येष्ठ कन्या सौ. साधनाताई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रीतमसिंह, हिमालय आणि शंभुराजे अशी त्यांना तीन पुत्ररत्ने आहेत. मुलांच्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी पुण्यातील प्रभात रोड येथे स्वतःचे घर करून शिक्षणाची व्यवस्था केली.
आज प्रीतमसिंह उद्योग सांभाळत आहेत, हिमालय आय.आर.एस. होऊन मुंबई आयकर विभागात आयुक्त पदावर कार्यरत आहेत, तर शंभुराजे कन्स्ट्रक्शन व्यवसाय पाहत आहेत.

शेतकऱ्यांसाठी कारखान्याची निर्मिती
“आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो” या उदात्त हेतूने देवकाते पाटील यांनी मल्हार साखर कारखान्याची निर्मिती केली. नोकरीत असतानाच शेतकऱ्यांना पाणी देऊन त्यांचे उत्पन्न वाढवले. सेवानिवृत्तीनंतरही शेतकऱ्यांच्या ऊसाला चांगला भाव मिळावा या उद्देशाने कारखाना उभा केला. सध्या कारखाना अंतिम टप्प्यात असून लवकरच त्याचा शुभारंभ होणार आहे.

श्री. काशिनाथ देवकाते पाटील यांचा जन्म 13 जुलै 1961 रोजी झाला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त मित्रपरिवार, नातेवाईक आणि हितचिंतकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button