साताऱ्यात गुलालानंतरच सोलापूर ‘डीसीसी’च्या रणांगणात

क्षमतेप्रमाणे मागितले तर बिनविरोध; अन्यथा पुन्हा जागा दाखवू – पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर (बारामती झटका)
दोन तलवारी एका म्यानात राहत नाहीत म्हणतात; पण आम्ही एका म्यानात दहा-दहा तलवारी सुटसुटीत ठेवलेल्या आहेत,” असे सांगत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी निवडणुकीवर भाष्य केले. “क्षमतेप्रमाणे मागणी झाली तर निवडणूक बिनविरोध होईल; मात्र आमच्याशिवाय काहीच होणार नाही, अशी भूमिका घेणाऱ्यांना या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देऊ,” असा इशाराही त्यांनी दिला. सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळल्यानंतरच सोलापूर डीसीसी बँकेच्या रणांगणात उतरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बैंक कर्मचारी पतसंस्थेतर्फे आमदार राजेंद्र राऊत यांचा सत्कार आज सुशील रसिक सभागृहात झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, महापौर विनायक कोंड्याल, आमदार सचिन कल्याणशेट्टी, देवेंद्र कोठे, माजी आमदार राजन पाटील, राम सातपुते, दीपक साळुंखे, भाजप शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, महापालिका सभागृह नेते नरेंद्र काळे आदी उपस्थित होते. पतसंस्थेचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी आमच्या सोसायटीप्रमाणे डीसीसीचीही निवडणूक बिनविरोध होण्याची अपेक्षा प्रास्ताविकात व्यक्त केली. त्याच धाग्याचा आधार घेत आमदार राऊत, माजी आमदार पाटील व पालकमंत्री गोरे यांनी निवडणुकीबाबत स्पष्ट भाष्य केले.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा
पालकमंत्री गोरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा पुन्हा एकदा एकसंघ झाला आहे. आमदार राऊत आणि माझा उशिरा संपर्क आला; परंतु संस्था चांगल्या चालविणारे नेते म्हणून आमदार राऊत यांची ओळख आहे. आमदार कल्याणशेट्टी व राऊत यांनी संचालक म्हणून बँकेत यावे, अशी अपेक्षा माजी आमदार पाटील यांनी व्यक्त केली. बँकेत काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचीही मागणी त्यांनी केली. त्याच धाग्याचा आधार घेत पालकमंत्री गोरे यांनी हा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोडविला जाईल, असे आश्वासन दिले.

थकबाकी वसूल होणारच
सहकारी संस्थांत लोकप्रतिनिधींनी विश्वस्त म्हणून काम केले तर संस्था टिकतात. या संस्थांत लोकप्रतिनिधी मालक झाल्यास त्या मोडतात, असे गोरे यांनी सांगितले. सातारा बँक चांगली आहे. माझ्यामुळे बँकेत राजकारण नको म्हणून मी पहिल्यांदा मागे सरल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्हा बँकेचे कर्ज ज्यांनी थकविले आहे, त्यांना कोणालाही सोडणार नाही. त्यांच्याकडून पै न् पै वसूल केली जाईल. त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळतील, अशी माहितीही पालकमंत्री गोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विचित्र प्राणी आले अन् वाट लागली
जिल्हा बँक सुरळीत होती; पण मध्यंतरी काही विचित्र प्राणी बँकेत घुसले आणि त्यांनी मनमानी व नियमबाह्य कर्जवाटप केल्याने बँकेची वाट लागल्याचे आमदार राऊत यांनी सांगितले. बार्शी व माळशिरस तालुक्यांत मला आणि राम सातपुते यांना बँकेच्या कारभाराचा त्रास झाला. जिल्हा दूध संघाला बँकेचे व केंद्र शासनाचे बळ मिळाल्यास संघ पुन्हा नव्या जोमाने उभा राहील. त्यासाठी पालकमंत्री गोरे यांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आमदार राऊत यांनी केली.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



