रत्नत्रय पतसंस्था सदाशिवनगर सचिव ज्ञानेश उर्फ ज्ञानेश्वर राऊत माळशिरस पोलीस स्टेशनच्या कस्टडीत…

मोहिते पाटील, सातपुते, जानकर समर्थक यांच्यावर माळशिरस पोलीस स्टेशन येथे गंभीर गुन्हा दाखल….
भिशीपासून सुरू झालेला आर्थिक प्रवास खाजगी सावकार ते पतसंस्थेचे सचिव, चेअरमन, संचालक बनावट सह्या व खोट्या कागदपत्रांपर्यंत पोहोचला….
माळशिरस (बारामती झटका)
रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सदाशिवनगर संस्थेचे सचिव ज्ञानेश उर्फ ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत, संस्थेचे चेअरमन व सर्व संचालक यांच्या विरोधात संगनमताने बनावट सह्या व खोटी कागदपत्रे बनवून परस्पर लाखो रुपयांचे कर्ज उचलून आर्थिक फसवणूक केल्याबाबत तसेच खाजगी सावकार सोहम शामराव भगत, सागर जयराम उरवणे, प्रीतम शशिकांत दोशी, रामदास बबन गोफणे, कविता राहुल भगत, सुभाष विठ्ठल सुज्ञे, सर्व रा. सदाशिवनगर, ता. माळशिरस यांच्या विरुद्ध अवैध सावकारी करणे, ज्यादा वसुलीसाठी धमकावणे व जागा हडप करणे अशी दीपक रामचंद्र गोरे रा. सदाशिवनगर यांनी दिलेल्या तक्रारीवरून माळशिरस पोलीस स्टेशन येथे FIR नंबर 0493 गुन्हा नोंद झालेला आहे. सदरच्या गुन्ह्यात भारतीय दंड संहिता 1860 कलम 420, 417, 406, 465 ,468, 471, 506, 34, महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 कलम 39, 41, 45 कलमाअन्वये गुन्हा नोंद झालेला आहे
सदरच्या गुन्ह्यात फिर्यादी जबाब देताना, दीपक रामचंद्र गोरे यांनी पत्नी आई-वडील तीन मुली एकत्र कुटुंब राहत असून शेतीमध्ये मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतो, सदाशिवनगर येथे सन 2019 ते 2022 या कालावधीत भिशी चालवत होतो, भिशीमध्ये गावातील एकूण पन्नास सभासद होते. दरमहा एकूण पाच लाख रुपये वर्गणी जमा होत होती. नियमाप्रमाणे ज्या सभासदाला पैशाची गरज असे, त्याला ती रक्कम दिली जात होती. सन 2022 मध्ये सदर भिशी बंद पडली. त्यामुळे 22 ते 23 सभासदांना भिशीचे वाटप झालेले होते आणि उर्वरित 27 सभासदांना भिशी मिळणे बाकी होते. ज्या सभासदांना भिशी मिळाली होती त्यांनी पुढील मासिक हप्ते भरणे बंद केल्याने अडचण निर्माण झाली. ज्या सभासदांना लाभ मिळाला नव्हता ते माझ्याकडे पैशाची मागणी करू लागले. त्या सभासदांचे पैसे देण्यासाठी मी सदाशिवनगर परिसरातील खाजगी सावकारांकडून व्याजाने पैसे घेण्याचे ठरवले त्यानुसार सोहम शामराव भगत एक लाख रु., सागर जयराम उरवणे दोन लाख रु., प्रीतम शशिकांत दोशी चार लाख रु., ज्ञानदेव पांडुरंग राऊत नऊ लाख रु., कविता राहुल भगत एक लाख वीस हजार रु., रामदास बबन गोपने एक लाख साठ हजार रु., सुभाष विठ्ठल सुज्ञे तीन लाख रु. अशा प्रकारे व्याजाने पैसे घेतले व सर्व खाजगी सावकारांची संपूर्ण रक्कम व्याजासह परत फेडलेली आहे.

सन 2020 मध्ये मला पैशाची गरज असताना ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांच्याकडून 18 लाख रुपये मी व्याजाने घेतले होते. त्या बदल्यात सावकारकीच्या रकमेपोटी माझी आई पारूबाई गोरे हिच्या नावावर असलेली राहत्या घराची जागा व जमीन 8.5 गुंठे ज्ञानदेव पांडुरंग राऊत यांनी स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. त्याचे सर्व पैसे फेडून ही त्याने आत्तापर्यंत सदर जागा आमच्या नावावर परत केलेली नाही. तसेच सर्व खाजगी सावकारांचे पैसे परत देऊनही माझ्याकडे आणखी बेकायदेशीर पैशाची मागणी करत असून मला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत. याशिवाय इसम ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत हा रत्नत्रय ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित सदाशिवनगर यांचे सचिव पदावर कार्यरत आहे. मी व माझी आई, पत्नी, वडील यांची सन 2014 पासून सदर पतसंस्थेत खाते असून आम्ही तिथे दम दुप्पट ठेवी ठेवल्या होत्या आणि आवश्यकतेनुसार मुदत ठेवीवर कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केलेली आहे.
आम्ही पतसंस्थेकडून कधीही कोणतेही वैयक्तिक कर्ज घेतले नाही. परंतु, सचिव ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत याने पतसंस्थेचे चेअरमन व संचालक मंडळाच्या संगनमताने आमच्या परस्पर कोणतीही माहिती न देता आमच्या खोट्या सह्या करून व नकली कागदपत्रे तयार करून आमच्या नावावर परस्पर आणि कर्ज मंजूर करून घेतली. त्यापैकी माझ्या नावावर परस्पर 15 लाख व 14 लाख रुपयाचे बनावट कर्ज उचलण्यात आले आहे. तसेच माझे व माझे कुटुंबाच्या नावे 50 हजार रुपयाची इतर अनेक बनावट कर्ज सचिव ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांनी उचलली आहेत. या कर्जाच्या रकमेचा गैरवापर करून ज्ञानेश्वर राऊत याने सदाशिवनगर परिसरात बेकायदेशीर खाजगी सावकारी करत आहेत. या अपराधाबाबत पतसंस्थेत चौकशी केली असता मला कोणतीही समाधानकारक माहिती न देता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. पतसंस्थेचे सचिव ज्ञानेश्वर पांडुरंग राऊत यांनी माझे व माझे कुटुंबियाचे नावे कर्ज स्वरूपात पैसे घेऊन त्यामधून स्वतःचा फायदा करून घेतला व सदर रक्कम स्वतःच पतसंस्थेमध्ये भरून त्याची परतफेड केली आहे. असा जबाब पोलीस स्टेशन येथे दिल्याने माळशिरस पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद झालेला असून त्यामधील रत्नत्रय पतसंस्थेचे सचिव ज्ञानदेव ज्ञानेश उर्फ ज्ञानेश्वर राऊत माळशिरस पोलीस स्टेशनच्या कस्टडीमध्ये आहेत. सदर गुन्ह्याचा तपास माळशिरस पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. विशाल नवले करीत आहेत…

सदरच्या गुन्ह्यामध्ये मोहिते पाटील, सातपुते, जानकर समर्थक असल्याने राजकीय वर्तुळासह सहकार क्षेत्रात खळबळ माजलेली असून खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत.. अजून सविस्तर बातमी पुढच्या भागात…..
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



