‘नवदुर्गा सन्मान २०२६’ सोहळ्यात माळशिरसच्या महिला पत्रकार शोभा वाघमोडे यांचा गौरव…

आर.एस.एस. पंढरपूर जिल्हा संपर्क विभागाचा उपक्रम
माळशिरस (बारामती झटका)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर जिल्हा संपर्क विभागाच्या वतीने नवरात्रीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून ‘नवदुर्गा सन्मान – २०२६’ सोहळ्याचे शानदार आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात माळशिरस आणि परिसरात पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न मांडणाऱ्या महिला पत्रकाराला मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून अकलूज येथील प्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ. एम के. इनामदार तर प्रमुख वक्त्या म्हणून महिला समितीच्या श्रद्धाताई कुलकर्णी (पंढरपूर) उपस्थित होत्या. व्यासपीठावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पंढरपूर जिल्ह्याचे जिल्हा संघचालक डॉ. रमेश संपती सिद, संपर्क प्रमुख प्रदीप कनाळ, सह संपर्क प्रमुख संग्राम चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना सन्मानार्थी महिला पत्रकाराने आर.एस.एस. पंढरपूर जिल्हा संपर्क विभागाचे आभार मानले. “एक पत्रकार म्हणून माळशिरस आणि परिसरात काम करताना, समाजाचे प्रश्न मांडणे आणि लोकांपर्यंत सत्य पोहोचवणे हे मी माझे कर्तव्य मानले. आज नवरात्रीच्या निमित्ताने समाजकार्यात योगदान देणाऱ्या महिलांचा गौरव करून या विभागाने खऱ्या अर्थाने ‘नारीशक्तीचा’ आणि समानतेचा सन्मान केला आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “हा सन्मान केवळ माझा एकटीचा नसून, माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात मला खंबीर साथ देणारे माझे कुटुंब आणि माझे सर्व वाचक यांचा आहे. हा पुरस्कार मला भविष्यात अधिक जबाबदारीने, निष्ठेने काम करण्याची नवी ऊर्जा आणि प्रेरणा देईल.”
या सोहळ्याला परिसरातील नागरिक, महिला भगिनी आणि रसिक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा पुरस्कार सोहळा नारीशक्तीचा गौरव करणारा आणि समाजकार्याला गती देणारा ठरला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



