ताज्या बातम्यासामाजिक

अकलूजमधील फटाके स्टॉलचा लिलाव नेमका कोणाच्या अधिकारात ?

खाजगी जागेवरील स्टॉल वाटप, सुरक्षितता आणि पारदर्शकतेबाबत तुषार केंगार यांचे प्रशासनाला निवेदन!

अकलूज (बारामती झटका)

दिवाळीनिमित्त अकलूज नगरपरिषद हद्दीत फटाके विक्रीसाठी स्टॉल उभारणे आणि त्यांचे वाटप करण्याच्या प्रक्रियेबाबत पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते तुषार मारुती केंगार यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी सोलापूर, पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि अकलूज नगरपरिषद प्रशासनाकडे लेखी निवेदन सादर केले आहे.

संबंधित जागा खाजगी मालकीची असल्यास तेथे स्टॉल उभारण्याची परवानगी आणि लिलाव करण्याचा अधिकार कोणाला आहे ?, जागामालकाची संमती, लिलावाचा कायदेशीर आधार आणि आर्थिक व्यवहारांबाबत पारदर्शकता आहे का ? याची स्पष्टता प्रशासनाने द्यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

माळशिरस तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन लिलावाऐवजी पारदर्शक चिठ्ठी पद्धतीने स्टॉल वाटप करावे, जेणेकरून छोट्या व्यावसायिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडणार नाही आणि पात्र व्यावसायिकांना समान संधी मिळेल, अशी भूमिका केंगार यांनी मांडली आहे.

तसेच, फटाके विक्रीसाठी आवश्यक परवानग्या, अग्निसुरक्षा, स्टॉलची सुरक्षित मांडणी आणि संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी संबंधित विभागांनी तपासणी करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

आता प्रशासन या निवेदनाची दखल घेऊन जागेच्या मालकी हक्कापासून स्टॉल वाटपाच्या प्रक्रियेपर्यंत सर्व बाबींवर अधिकृत भूमिका स्पष्ट करणार का ?, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button