माळशिरस तालुक्यामध्ये दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत तालुका कृषी अधिकारी यांना निवेदन

शिवसेना ओबीसी चे जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांचे तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रूपनवर यांना निवेदन
माळशिरस (बारामती झटका)
माळशिरस तालुक्यात सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांसमोर शेती व पशुधन जगविण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत उजनी व वीर धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा शेतकऱ्यांना योग्य प्रकारे लाभ मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी शिवसेना ओबीसी चे जिल्हा प्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी फळबागा टिकविण्यासाठी शेतकरी बांधवांच्या शिवार बैठका आयोजित करून मार्गदर्शन करणे तसेच पशुधन संवर्धनाबाबत मार्गदर्शन शिबिरे आयोजित करण्याबाबत माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांना निवेदन दिले आहे.
धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा काटकसरीने व नियोजनपूर्वक वापर करून फळबागा टिकविणे, ठिबक सिंचनाचा वापर, पाणी व्यवस्थापन, आच्छादन तंत्रज्ञान तसेच कमी पाण्यात फळबागांचे संवर्धन कसे करता येईल, याबाबत शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शिवारात मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.
तसेच दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी पाणी व चाऱ्याचे नियोजन, चारा उपलब्धता, चारा साठवणूक, पशुखाद्य व्यवस्थापन, जनावरांचे आरोग्य व संवर्धन याबाबतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.

सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, आपण आपल्या कृषी विभागामार्फत माळशिरस तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवार बैठका आयोजित करून उजनी व वीर धरणातून उपलब्ध होणाऱ्या पाण्याचा फळबागांसाठी कशा प्रकारे उपयोग करता येईल, याबाबत शेतकऱ्यांना तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करावे. तसेच पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने पशुधन टिकविण्यासाठी व संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती देणारी मार्गदर्शन शिबिरे आयोजित करावीत, ही नम्र विनंती. अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजकुमार हिवरकर पाटील यांनी माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे.
यावेळी माळशिरस तालुकाप्रमुख तानाजीराव भोळे पाटील, जिल्हा उपप्रमुख दादासाहेब लोखंडे, शिवसेनेचे जिल्हा संघटक बापू लोखंडे, शिवसेनेचे हेमंत चव्हाण यांच्यासह माळशिरस तालुका कृषी अधिकारी आबासाहेब रुपनवर व माळशिरस तालुक्यातील सर्व मंडल अधिकारी, कृषी अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



