अकलूजमधील आंबेडकर वसतिगृहाचा तिढा सुटणार ? सभापती संस्कृतीताई सातपुतेंच्या पाठपुराव्याला यश; पालकमंत्र्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या बैठकीचे आदेश!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अकलूजच्या जागेसाठी पालकमंत्री जयकुमार गोरे सकारात्मक; लवकरच निर्णय होणार
अकलूज (बारामती झटका)
सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांची समाजकल्याण सभापती सौ. संस्कृतीताई सातपुते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह अकलूजच्या जागा व बांधकाम प्रश्नासाठी भेट घेतली; जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने बैठक घेण्याचे आदेश
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री ना. जयकुमार गोरे (जयाभाऊ) यांची दहिगाव जि.प. गटाच्या सदस्या तथा सोलापूर जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती सौ. संस्कृतीताई रामभाऊ सातपुते यांनी भेट घेतली.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा, गोरगरीब विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह, अकलूज साठी जागा उपलब्ध करून त्वरित बांधकाम करण्यासाठी तातडीने बैठक घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी पालकमंत्र्यांना सांगितले.
यावेळी त्यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन दिले. सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, मौजे अकलूज परिसरामध्ये विविध प्रकारचे शाळा, महाविद्यालय असून तेथे गेली अनेक वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृह हे तात्पुरत्या भाड्याच्या इमारती मध्ये चालू असून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रचंड गैरसोईचा सामना करावा लागत आहे. वसतिगृहासाठी स्वतंत्र मालकी हक्काची जागा उपलब्ध नाही.
तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय वसतिगृहासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी संबधीत अधिकाऱ्यांसमवेत बैठक आयोजित करणेकरिता संबधीतांना आदेश द्यावेत, ही विनंती.

यावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना वसतिगृहासाठी तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सभापती संस्कृतीताई सातपुते यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश येणार आहे.

प्रस्थापितांनी प्रश्न भिजत घोंगडे ठेवला होता?
अकलूजमधील प्रस्थापित मोहिते-पाटलांनी जाणीवपूर्वक डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहासाठी जागा उपलब्ध होऊ नये यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप होत आहे. जर शासकीय वसतिगृह झाले तर त्यांच्या बगलबच्च्यांच्या इमारतीला मिळणारे भाडे बंद होईल, यासाठीच हा प्रश्न भिजत घोंगडे ठेवला होता, अशी चर्चा आहे. यामुळे आंबेडकरी समाजातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती.
सध्या हे वसतिगृह उपजिल्हा रुग्णालय, अकलूज येथील पोस्टमॉर्टम रूम शेजारील एका भाडोत्री इमारतीमध्ये सुरू होते. रुग्णालय परिसरात सतत येणारे अपघाती रुग्ण आणि पोस्टमॉर्टममुळे विद्यार्थ्यांमध्ये घबराट निर्माण होत होती व अभ्यासात व्यत्यय येत होता. प्रसारमाध्यमांनी हा मुद्दा उचलल्यानंतर ते अन्य ठिकाणी हलवण्यात आले, परंतु हक्काचे स्वतःचे वसतिगृह असावे, हीच विद्यार्थ्यांची मागणी आहे.
यापूर्वी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांनी समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट यांना श्रीराम बंगल्यावर या विषयी माहिती दिली होती, त्यावेळी वसतिगृहासाठी 10 कोटी रुपये देण्याचे कबूल करण्यात आले होते.

आता पालकमंत्र्यांनीच लक्ष घातल्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाचा प्रश्न लवकरच निकाली निघणार असल्याची आशा निर्माण झाली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



