बारामती तालुक्यात ६१ लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ

बारामती (बारामती झटका)
‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ सेवा पंधरवड्यानिमित्त राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पणदरे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ या विशेष मोहिमेला बारामती तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दि. २७ ते २९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत आयोजित या विशेष मोहिमेअंतर्गत बारामती तालुक्यातील संबंधित मंडळाच्या ठिकाणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरासाठी मंडळ अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, महा-ई-सेवा केंद्र चालक तसेच आधार सेवा केंद्र चालक उपस्थित होते.

भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, यासाठी गावागावांत जनजागृती करण्यात आली. शिबिरामध्ये विविध जातींतील ४७ लाभार्थ्यांनी जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज दाखल केले, तर ७ लाभार्थ्यांनी नवीन शिधापत्रिका मिळण्यासाठी अर्ज सादर केले. तसेच ७ लाभार्थ्यांचे आधारकार्डशी संबंधित कामकाज पूर्ण करण्यात आले. अशा प्रकारे एकूण ६१ लाभार्थ्यांना विविध शासकीय सेवांचा लाभ मिळाला.
भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना आवश्यक कागदपत्रे व शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरत असल्याची माहिती तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी कळविले आहे.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



