बारामतीत दिव्यांग दिनानिमित्त मतदार नोंदणी कार्यक्रम संपन्न

बारामती (बारामती झटका)
जागतिक दिव्यांग दिनानिमित्त गुणवडी चौक येथे दिव्यांग नागरिकांसाठी मतदार नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, निवासी नायब तहसीलदार विलास करे, पंचायत समिती दिव्यांग कल्याण कक्षाचे संदीप शिंदे, बारामती सहकारी बँकचे अध्यक्ष सचिन सातव, जागृती दिव्यांग विश्वस्त संस्थेचे अध्यक्ष दीपक गायकवाड आदी उपस्थित होते. दिव्यांग मतदारांना मिळणारा मतदानाचा हक्क, त्यांना मतदानाच्या दिवशी मिळणाऱ्या सोई-सुविधेबाबत श्री. नावडकर यांनी माहिती दिली. भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने घोषित करण्यात आलेल्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाअंतर्गत मतदार नोंदणी मोहीम सुरु असून त्यांचा दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
श्री. शिंदे यांनी जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्याचा उद्देश, दिव्यांगांसाठीच्या केंद्र व राज्य शासनाच्या योजना, शिष्यवृत्ती, निर्वाह भत्ता, आधार कार्ड तसेच नवीन दिव्यांगत्व प्रमाणपत्र काढण्याबाबत माहिती दिली. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे तपासणी करून दिव्यांगत्व प्रमाणपत्र व आधार कार्ड देण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असेही श्री. शिंदे म्हणाले. यावेळी श्री. सातव व श्री. गायकवाड यांनीही विचार व्यक्त केले.

यावेळी दिव्यांग मतदार नोंदणीकरीता ६० अर्ज वाटप करण्यात आले. तसेच जागृती दिव्यांग संस्थेच्यावतीने १७ दिव्यांग विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व शालीचे वाटप करण्यात आले. दिव्यांग ऑलिम्पिक स्पर्धेत निवड झाल्याबद्दल दिशा साळवे हीचा सत्कार करण्यात आला.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९७६६७०३५१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.