“चर्चा तर होणारच…” पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताची चर्चा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची आठवण करून देणारा स्वागत सोहळा…..

देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी सुद्धा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवले मात्र, जनतेच्या मनातील पालकमंत्री जयाभाऊ झाले; स्वयंस्फूर्तीने स्वागतासाठी अलोट जनसागर लोटला…
माळशिरस (बारामती झटका)
महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री व भाजपचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी महायुतीच्या सरकारमधील ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे उर्फ जयाभाऊ यांची सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी नियुक्ती केलेली होती. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे सोलापूर येथील पदभार घेण्यासाठी शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाला सपत्नीक अभिषेक करून माळशिरस तालुक्यात शिंगणापूर पाटी वरून नातेपुते, माजी आमदार राम सातपुते यांचे श्रीराम बंगला निवासस्थान, माळशिरस, वेळापूर असे शासकीय प्रोटोकॉलमध्ये सत्काराचे नियोजन शासकीय दौऱ्यात करण्यात आलेले होते.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागताची चर्चा श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याची आठवण करून देणारा असा जयाभाऊ यांचा स्वागत सोहळा संपन्न झालेला आहे. देशाचे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद भूषवलेले आहे. मात्र, जनतेच्या मनातील पालकमंत्री जयाभाऊ झाले. त्यामुळे स्वयंस्फूर्तीने स्वागतासाठी अलोट जनसागर लोटलेला होता.


श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यामध्ये नातेपुते, माळशिरस व वेळापूर मुक्कामाची ठिकाणे आहेत. याच ठिकाणी पालकमंत्री जयाभाऊ यांचे स्वागत करण्याची सार्वजनिक ठिकाणे होती. तर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम निवासस्थानी सदिच्छा भेट व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलेले होते.



नातेपुते येथील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकामध्ये प्रथमत: शिवप्रसाद उद्योग समूहाचे सर्वेसर्वा उद्योजक श्री. शरदबापू मोरे व सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्या व शिवप्रसाद वुमन अर्बन बँकेच्या चेअरमन सौ. ऋतुजाताई मोरे या उभय दाम्पत्यांच्या वतीने पवित्र तुळशीच्या माळेचा हार क्रेनच्या साह्याने घालून सत्कार करण्यात आला. पालकमंत्री यांच्या समवेत माढा लोकसभेचे कार्यतत्पर व पाणीदार माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते, फलटण कोरेगाव विधानसभेचे विद्यमान आमदार सचिन पाटील आदी उपस्थित होते.

भारतीय जनता पार्टी नातेपुते शहराच्या वतीने सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अकलूज कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक नातेपुते नगरपंचायतीचे नगरसेवक ॲड. भानुदास राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्टेज उभारण्यात आलेले होते. सदरच्या स्टेजवर पालकमंत्र्यांसह उपस्थित मान्यवरांचा क्रेनच्या सहाय्याने हार घालून सत्कार करण्यात आला. लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या मांडवे येथील श्रीराम बंगला निवासस्थानी पालकमंत्री व उपस्थित मान्यवरांचे जंगी स्वागत करून स्नेह भोजनाचा आस्वाद घेतलेला होता.


माळशिरस शहरात भारतीय जनता पक्षाचे निमंत्रित प्रांतिक सदस्य व माळशिरस नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सत्कार समारंभाचे नेटके नियोजन करण्यात आलेले होते. क्रेनच्या सहाय्याने हार घातलेला होता तर स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी, हलग्यांचा कडकडाट व जेसीबीच्या साह्याने फुलांची उधळण करण्यात आली होती. माळशिरस नगरपंचायतीचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष वस्ताद विजयराव देशमुख यांनी नगरपंचायतीच्या वतीने उपस्थित नगरसेवकांच्या समवेत स्वागत केले. भारतीय जनता पक्ष वेळापूर शहर, मदनसिंह माने देशमुख, पिनूभाऊ येडगे, मिलिंद उर्फ पप्पू सरतापे, स्वप्निल माने देशमुख, ओंकार खराडे, राहुल माने देशमुख, काकासाहेब जाधव, पदाधिकारी यांनी नियोजन केलेले होते. अधिकृत पालकमंत्री यांच्या नियोजित दौऱ्यातील सत्काराबरोबर शिंगणापूर पाटीपासून दसुरपाटीपर्यंत अनेक सामाजिक संघटना, कार्यकर्ते, आजी-माजी सरपंच, महायुतीच्या घटक पक्षातील पदाधिकारी यांनी सन्मान केलेला होता.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी पालखी सोहळ्यामध्ये मानाच्या दिंड्या असतात. त्यामधील वारकरी वैष्णव यांना वेगळे महत्त्व असते. सदरच्या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी व्यवसायिक, चोरहौशी, नवशी, गवशी, असतात. तशाच पद्धतीने पालकमंत्री यांच्या स्वागतासाठी निष्ठावान महायुतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर गद्दारांची सुद्धा स्वागतासाठी लगबग होती. लोकसभेला महाविकास आघाडीला चांगले मताधिक्य मिळाले असल्याने विधानसभेला अनेकांनी तुतारी वाजवलेली होती. वाजवायला फोनाफोनी केली होती असेच तुतारी वालेसुद्धा जयाभाऊ यांच्या स्वागतासाठी आलेले होते. प्रचंड जनसागर लोटलेला होता.
नातेपुते परिसरातील अनेक गावचे पदाधिकारी, गावातील लोकप्रतिनिधी उपस्थित होते. तर, माळशिरस येथील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चौकामध्ये अलोट जनसागर लोटलेला होता. चौकामध्ये क्रेन व जेसीबी यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलेले होते. माजी नगराध्यक्ष डॉ. आप्पासाहेब देशमुख व माळशिरसकरांच्या स्वागताने पालकमंत्र्यांच्या समवेत असणारे नेते, कार्यकर्ते व सर्व फौज फाटा यांचे लक्ष वेधून घेतलेले होते. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या स्वागतासाठी जरी गद्दारांनी गर्दी केली असली तरी भविष्यात महायुतीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पाठीशी सरकार उभे राहणार आहे. आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांबरोबर शासनाचे महामंडळ, विविध समित्या, जिल्हा व तालुका कमिट्या यावर निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी मिळणार, असा पालकमंत्र्यांच्या दौऱ्यामध्ये नेतेमंडळींचा सूर दिसून येत होता. त्यामुळे निष्ठावान महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत.


नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.