डी-४ व मायनर कॅनलवरील शेतकऱ्यांची खरीप पिके व गुरांच्या चाऱ्याची अपूर्ण भरणी, वारंवार कमी होणारा पाण्याचा डिस्चार्ज आणि सुरळीत पाणीवाटपाबाबत निरा उजवा कालवा, माळशिरस शाखेचे उपकार्यकारी अभियंता सो, यांना निवेदन

वेळापूर (बारामती झटका)
वेळापूर, ता. माळशिरस येथील समस्त शेतकरी बांधवांनी डी-४ व मायनर कॅनलवरील शेतकऱ्यांची खरीप पिके व गुरांच्या चाऱ्याची अपूर्ण भरणी, वारंवार कमी होणारा पाण्याचा डिस्चार्ज आणि सुरळीत पाणीवाटपाबाबत निरा उजवा कालवा, माळशिरस शाखेचे उपकार्यकारी अभियंता सो, यांना निवेदन दिले आहे. सदर निवेदनावर प्रतिनिधी अमृतराज सूर्यकांत माने देशमुख, संदीप अशोकराव माने देशमुख, चंद्रकांत नारायण पोळ, संतोष पांडुरंग सावंत, भागवत रामचंद्र शिंदे, प्रकाश ज्योतिराम माने, दीपक गोविंद शिंदे, नारायण रामचंद्र शिंदे, तुकाराम पांडुरंग शिंदे, लालासो नवनाथ माने, राजेंद्र स्वामी चव्हाण, अजित गजानन काटे, अनिल दामोदर व्यवहारे, निखिल भागवत शिंदे, अभिजीत विठ्ठल म्हेत्रे, गजानन शिवाजी सावंत, सुधीर मोतीलाल व्होरा, गणेश लालासाहेब कदम, शितलकुमार विजय जाधव, अजय हनुमंत जगदाळे, अशोक चांगदेव सावंत, साहेबराव रामा वाघमोडे, विनायक तुकाराम खराडे, गोपाळराव गजानन घार्गे देशमुख, ओंकार विठ्ठल घोरपडे, सौरभ सुखदेव शिंदे, ऋषिकेश भगवान शिंदे, सोमनाथ नामदेव सावंत आदी शेतकरी बांधवांच्या सह्या असून हे निवेदन नीरा उजवा कालवा माळशिरस शाखेचे उपकार्यकारी अभियंता यांना देण्यात आले आहे.
सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे कि, वेळापूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील डी-४ व मायनर कॅनलवरील समस्त शेतकरी बांधव आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की, सदर कालव्यावरील अनेक शेतकऱ्यांची खरीप पिके तसेच गुरांच्या चाऱ्यासाठी आवश्यक असलेली भरणी अद्याप अपूर्ण राहिलेली आहे.
याशिवाय, कालव्यातील पाण्याचा डिस्चार्ज वारंवार कमी होत असून त्यावर प्रभावी नियंत्रण असल्याचे दिसून येत नाही. परिणामी, कालव्याच्या शेवटच्या टोकावरील अनेक शेतकऱ्यांना आवश्यक प्रमाणात पाणी मिळत नाही. यामुळे खरीप पिके, गुरांच्या चाऱ्याची पिके तसेच शेतकऱ्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम होत आहे.
सदर परिस्थिती कायम राहिल्यास येणाऱ्या काळात शेतकरी व ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा तसेच गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
त्यामुळे आमच्या पुढील मागण्या तात्काळ मान्य करण्यात याव्यात :
१. डी-४ व मायनर कॅनलवरील सर्व शेतकऱ्यांची अपूर्ण राहिलेली खरीप पिके व गुरांच्या चाऱ्याची भरणी तात्काळ पूर्ण करण्यात यावी.
२. कालव्यातील पाण्याचा डिस्चार्ज नियोजित प्रमाणात व अखंडित ठेवून त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी प्रभावी नियंत्रण ठेवावे.
३. सर्व शेतकऱ्यांना समान, न्याय्य व नियोजनबद्ध पाणीवाटप करण्यात यावे.
४. कालव्याच्या शेवटच्या टोकापर्यत पाणी पोहोचेल यासाठी प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात.
५. शेतकऱ्यांची खरीप पिके व गुरांच्या चाऱ्याची पिके तात्काळ भिजवून घेण्यासाठी आवश्यक प्रमाणात पाणी उपलब्ध करून द्यावे.
६. भविष्यात पिण्याच्या पाण्याची व गुरांच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, यासाठी योग्य नियोजन करावे. वरील मागण्यांवर तात्काळ कार्यवाही न झाल्यास, वेळापूर येथील समस्त शेतकरी बांधव नाईलाजास्तव दिनांक ऑक्टोबर २०२६ रोजी वेळापूर चौक येथे रस्ता रोको आंदोलन व धडक मोर्चा आयोजित करतील.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



