दिवंगत डॉ. डी. वाय. पाटील यांचे सातव्या दिवशी उत्तरकार्य

पाटील परिवाराचा निर्णय स्वागतार्ह : वसंतराव मुळीक
कोल्हापूर (बारामती झटका)
पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे उत्तरकार्याचे सर्वच विधी सातव्या दिवशी म्हणजे सोमवारी (दि. १०) करण्यात आले. पॅव्हेलियन ग्राऊंड येथे डॉ. पाटील यांचा रक्षाविसर्जन विधी झाल्यानंतर त्याच ठिकाणी हा निर्णय जाहीर करण्यात आला होता. मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी या निर्णयाचे स्वागत करून शाहूंच्या भूमीत असा सामाजिक संदेश दिल्याबद्दल पाटील कुटुंबाचे आभार मानले.
डॉ. डी. वाय. पाटील यांनी देश-परदेशात माणसांचा मोठा गोतावळा निर्माण केला आहे. तसेच, कसबा बावडा येथील पाटील गल्लीत त्यांची मोठी भावकी आहे. या भावकीमध्ये बाराव्या दिवशी उत्तरकार्य आणि इतर विधी केले जातात; पण डॉ. डी. वाय. पाटील यांनी नेहमी प्रगतीचा विचार मांडला. त्यांच्या निधनानंतर हा विचार पुढे नेण्याचा निर्णय पाटील कुटुंबाने घेतला.

आमदार सतेज पाटील यांनी यासाठी पुढाकार घेऊन आपले बंधू डॉ. संजय डी. पाटील, डॉ. विजय पाटील, डॉ. अजिंक्य पाटील यांच्यासह सर्व बहिणी आणि परिवारासोबत चर्चा करून सातव्या दिवशी उत्तरकार्याचे सर्वच विधी करण्याचा निर्णय घेतला.
त्याबरोबर डॉ. पाटील यांची रक्षा पंचगंगा नदीमध्ये विसर्जित न करता कसबा बावडा आंब्याचा मळा, कासारकी, जुना मळा तसेच तळसंदे आणि माले येथील शेतीमध्ये पसरण्यात आली. पाटील परिवाराच्या या निर्णयाचे स्वागत करून मुळीक म्हणाले, दादांनी बहुजन समाजासाठी दूरदृष्टी ठेवून अनेक सामाजिक उपक्रम राबविले. डॉ. डी. वाय. पाटील परिवाराने दादांचे उत्तरकार्याचे सर्वच विधी सातव्या दिवशी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांसमोर एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. पाटील परिवाराने सामाजिक दूरदृष्टीने दिलेला हा विचार शाहूंच्या जन्मभूमीत समाजाला नवीन सामाजिक संदेश देणारा ठरणारा आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



