Uncategorized

Farmer Success Story : पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत भाजीपाला शेतीतून लाखोंचं उत्पन्न, माळशिरस तालुक्यातील आनंदनगरच्या प्रयोगशील शेतकऱ्याची यशोगाथा.

माळशिरस (बारामती झटका)


आनंदनगर येथील युवा प्रयोगशील शेतकरी सुभाष दांगट यांनी पारंपरिक पिकांना बगल देत भाजीपाला शेती करुन आर्थिक उन्नती साधली आहे.
पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणे आज आवश्यक झाले आहे. सध्या प्रयोगशील शेतीचे दिवस आहेत. जे विकते ते पिकविण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिवसेंदिवस सिद्ध होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करुन, त्यांचे उत्पन्न वाढवण्यास शासनाकडून प्रोत्साहन दिले जात आहे. पारंपरिक पिके घेतल्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. त्यात वाढ होण्यासाठी नवनवीन कृषी तंत्रांचा, यांत्रिकीकरणाचा पर्याय उपलब्ध करणे गरजेचे झाले आहे. दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील आनंदनगर येथील प्रयोगशील शेतकरी सुभाष दांगट यांनी पारंपरिक पिकांना बगल देत भाजीपाला शेती करुन आर्थिक उन्नती साधली आहे. तर भाजीपाला शेतीतून त्यांना आतापर्यंत लाखोंचं उत्पन्न मिळाले आहे. 
त्यांनी आपल्या शेतात कारले, दोडके, टोमॅटो, भेंडी, गवारी, पावटा अशा प्रकारचा भाजीपाला पिकाची लागवड केली आहे. यातून त्यांनी आर्थिक प्रगतीचा मार्ग शोधला आहे. कमी खर्चात जास्त उत्पादन काढण्याचा आणि रासायनिक खतांचा कमी वापर कसा करता येईल याकडे त्यांचे विशेष लक्ष असते.यासाठी त्यांनी आपल्या शेतात Automatic Weather Station या नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये आपल्याला हवामानाचा संपूर्ण अंदाज मिळतो (तापमान, आर्द्रता,पर्जन्यमान,मातीचे तापमान,वा-याची गती). तसेच कीड व्यवस्थापनामध्ये सोलर ट्रॅपचा वापर करतात.
माळशिरस तालुक्यातील हे एकमेव शेतकरी आहेत ज्यांनी आपल्या शेतात Automatic Weather Station ची स्थापना केली आहे. याच्या साहाय्याने त्यांनी उत्कृष्ट पद्धतीने शेती करून आपल्या भाजीपाल्याला चांगला बाजारभाव मिळविला आहे. त्यांनी कमी वेळेत व कमी वयात अत्यंत चांगल्या प्रकारे शेती करून सर्व शेतकर्यांसाठी आदर्श निर्माण केला आहे.
माळशिरस तालुक्यातील प्रयोगशील शेतकरी अशी दांगट यांची ओळख असून, ते दरवर्षी त्यांच्या शेतात नवनवीन प्रयोग करत असतात. तसेच कृषी विभागाच्या विविध योजनांचा त्यांनी लाभ घेतलेला आहे. कृषी प्रदर्शन, कृषी महोत्सवाला भेटी देत कृषीविषयक विविध कार्यशाळांमध्ये सहभागी होतात. कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे त्यांना वेळोवेळी सहकार्य व मार्गदर्शन लाभत असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पारंपारिक शेतीला जोडधंदा व विविध तंत्रज्ञानाचा वापर करुन सर्व शेतकऱ्यांनी आपल्या कृषी उत्पन्नात वाढ करावी. मागील अनेक वर्षापासून पारंपरिक शेतीला पूरक अशी फळबाग आणि भाजीपाला शेती यातून नफा मिळवून शेतकऱ्यांनी आधुनिक शेती करावी. तसेच शेतीमध्ये नवनवीन प्रयोगांचा अवलंब करावा, असे सुभाष दांगट इतर शेतकऱ्यांना सांगतात. दांगट यांच्या शेतीस पाणीव कृषी
महाविद्यालयातील कृषिदूत प्रथमेश वाघमोडे, भुषणकुमार तरंगे, ओंकार वळकुंडे, तेजस शेरकर, संस्कार मुळे, शुभम कोकाटे, ऋषीकेश धोंडे यांनी भेट दिली. यास कार्यक्रम अधिकारी डाॅ.जबिन शेख यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button