ताज्या बातम्यासामाजिक

ग्रामपंचायत बरी होती पैसे जास्त पाणी निकृष्ट

माळेवाडीकरांची शुद्ध पाण्याची मागणी

अकलूज (बारामती झटका)

नगरपरिषद झाल्यापासून सुविधा वाढण्याऐवजी नागरिकांच्या खिशाला कात्री आणि आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. माळेवाडी (अ) गावातील नागरिकांनी आज मुख्याधिकारी सचिन पाटील यांची भेट घेऊन पाणीपट्टी कमी करण्याची मागणी केली. ग्रामपंचायत असताना वार्षिक पाणीपट्टी 1200 रुपये होती. नगरपरिषद झाल्यापासून ती 1500 रुपये झाली, म्हणजेच थेट 300 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

नगरपरिषदेकडून सध्या बोरवेलचे पाणी पुरवठा केला जात आहे. हे पाणी प्रचंड क्षारयुक्त व आरोग्यास घातक असल्याचा नागरिकांचा आरोप आहे “हे पाणी पिऊन गावात अनेकांना किडनीचे आजार जडत आहेत. लहान मुलांच्या आरोग्याची काळजी वाटते,” असे निवेदनात म्हटले आहे.

नाईलाजाने गावातील प्रत्येक कुटुंबाला RO फिल्टरचे किंवा कॅनचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. म्हणजे 1500 रुपये पाणीपट्टी भरूनही शुद्ध पाण्यासाठी महिन्याला 500 ते 800 रुपये अतिरिक्त खर्च करावा लागत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर माळेवाडीतील नागरिकांनी मुख्याधिकारी सचिन पाटील यांना निवेदन देऊन वाढीव 300 रुपयांची पाणीपट्टी माफ करावी, जोपर्यंत शुद्ध व नियमित पाणीपुरवठा होत नाही तोपर्यंत जुनी 1200 रुपये दराने पाणीपट्टी आकारावी, अशी मागणी केली आहे.

“आम्ही पाणीपट्टी भरतोय खरी, पण पिण्यायोग्य पाणी मिळतच नाही. वरून किडनीचे आजार विकत घेतोय आणि RO चा खर्च वेगळा. हा अन्याय नाही का ?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. मुख्याधिकारी सचिन पाटील यांनी या प्रश्नाची गंभीर दखल घेतली. “नागरिकांचे आरोग्य महत्वाचे आहे. तसेच पाणीपट्टीबाबतचा प्रस्ताव नगरपरिषदेच्या आगामी बैठकीत ठेवून सकारात्मक निर्णय घेऊ,” असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

यावेळी उपस्थित भाजप नगरसेविका जयश्री एकतपुरे, नगरसेवक महेश शिंदे, अकलूज मंडल सरचिटणीस अमित टिळेकर, माळेवाडी गावातील ग्रामस्थ संजय एकतपुरे, संजय खुडे, नवनाथ साठे, अतुल बनकर, लहू सुगावकर
आदी उपस्थित होते.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button