ताज्या बातम्यासामाजिक

लोकांवरील अन्याय अत्याचाराच्या विरोधात बंडखोरने आणखी प्रखर व्हावं – मा. आमदार रामभाऊ सातपुते


अकलूज (बारामती झटका)

आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ता म्हणून संपादक गौतम भंडारे हे साप्ताहिक बंडखोरच्या माध्यमातून अत्यंत तळमळीने चळवळीतील प्रश्न मांडून प्रखरपणे व्यक्त होत असतात. त्याच पध्दतीने त्यांनी आपली धारदार लेखणी लोकांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचार, शोषणाविरोधात चालवून बंडखोरच्या लेखणीने आणखी प्रखर व्हावं, असे प्रतिपादन माळशिरस विधानसभेचे लोकप्रिय दमदार मा. आमदार रामभाऊ सातपुते यांनी व्यक्त केले.
साप्ताहिक बंडखोरच्या १५ व्या वर्धापनदिनानिमित्त संपादक गौतम भंडारे यांनी धुरंधर पुरस्कार सोहळा व वर्धापनदिन विशेषांक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन केले होते, यावेळी ते बोलत होते.

यावेळी सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. त्यानंतर धुरंधर डॉ. बाबासाहेब आंबेडकर या वर्धापनदिन विशेषांकाचे प्रकाशन करून त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याप्रसंगी पुढे बोलताना रामभाऊ सातपुते म्हणाले की, धुरंधर पुरस्कार सोहळा हे एक माध्यम असले तरी कुठेतरी आपल्यामध्ये समाजसेवकांबद्दल प्रेम आहे, आणि म्हणूनच आपण त्यांना बोलावून त्यांचे कौतुक करीत असल्याबद्दल गौतम भंडारे यांचे अभिनंदन! आपण ज्या पध्दतीने लेखणीला धार देताय ते कौतुकास्पदच आहे. मात्र भविष्यात माळशिरस तालुक्यासह महाराष्ट्रात कुठेही लोकांवर अन्याय, अत्याचार होत असतील, त्यांचे शोषण होत असेल, कुणी लोकांना दहशतीत ठेवायचा प्रयत्न करीत असेल तर त्याठिकाणी गौतम भंडारे यांनी प्रखरपणे आपली पत्रकारिता करावी. हा पुरस्कार सोहळा कौतुकास्पद आहे, यावेळी ज्यांना पुरस्कार प्राप्त झाले आहेत अशा पुरस्कारार्थींनी यापुढे अधिक झोकून काम करावे, असे यावेळी रामभाऊ सातपुते म्हणाले.

अश्विनी हॉस्पिटलचे सर्वेसर्वा, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार म्हणाले की, संपादक गौतम भंडारे यांनी सलग १५ वर्षे चांगल्या पध्दतीने निर्भीडपणे केलेली पत्रकारिता भूषणावह आहे. त्यांच्या पत्रकारितेचे चटके सर्वांनाच बसले, तसेच मलाही एक-दोन वेळा चटके बसले. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून ते अत्यंत महत्वपूर्ण कार्य करीत असतात. कारण त्यात ते निष्णात झाले आहेत. यापुढे साप्ताहिक बंडखोरची भरभराट होवो, त्यांचे कार्य वाढो व समाजामध्ये नेहमी चेतना निर्माण होवो हीच प्रार्थना

पिंक रिव्होल्युशन, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. श्रध्दा जवंजाळ म्हणाल्या की, संपादक गौतम भंडारे यांनी खूपच कमी वेळेत माळशिरस तालुक्यातील सामाजिक, अध्यात्मिक, पत्रकारिता, विधी, वैद्यकीय व नर्सिंग या क्षेत्रातून शोधून काढलेले पुरस्कारार्थी अगदी कोळशातून हिरा शोधून काढावा तसे शोधून काढले आहेत. आपली परखड व सडेतोड पत्रकारिता यापुढेही अशीच तळपत राहो, आम्ही नेहमी आपल्यासोबत राहू.

आरपीआय (आठवले) युवक आघाडीचे राज्य उपाध्यक्ष किरण धाईंजे म्हणाले की, धुरंधर पुरस्कार हे नाव असे शोधले आहे की याचा अर्थ योध्दा होतो. गौतम भंडारे हा सुध्दा एक योध्दाच आहे. तो कुठेही असला तरी लढतो. कुणाला आणि कशालाच घाबरत नाही. पूर्वी बंडखोर हा पेपर लोक शोधून नेत असायचे. तालुक्यातून लोक बंडखोर पेपर कुठे मिळेल असे विचारत अकलूजला यायचे. कारण पेपर स्टॉलवर दिलेला बंडखोर पेपर शिल्लक राहत नव्हता. संपादक गौतम भंडारे यांचे काम खूप मोठे आहे. त्यांनी मला धुरंधर समाजरत्न हा पुरस्कार दिल्यामुळे मला आणखी प्रेरणा मिळाली आहे. भविष्यातही मी अन्याय, अत्याचाराच्या विरोधात लढून जास्तीत जास्त सामाजिक कार्य करण्यावर भर देईन.

साप्ताहिक बंडखोरचे कायदेशीर सल्लागार ॲड. सुमित सावंत म्हणाले की, पाक्षिक बंडखोर सुरू झाले तेव्हा नुकतीच माझी वकिली सुरू झाली होती. असं म्हणतात की, कोणत्याही चळवळीला जोपर्यंत एखाद्या वर्तमानपत्राची साथ मिळत नाही तोपर्यंत चळवळ जीवंत राहू शकत नाही. आंबेडकरी चळवळीला ताकद देण्याचे काम बंडखोरने केले आहे. 2013-14 साली मी शिक्षण घेऊन या भागात आल्यानंतर मी पाहिले की, अनेक लोक साप्ताहिक बंडखोरची वाट बघत बसायचे. तर जे लोक दहशतीत वावरत होते त्यांनी वृत्तपत्र विक्रेत्यांना नियमितपणे घेणाऱ्या पेपरमध्ये बंडखोर अंक देत जावा असे सांगितले होते. जिथे प्रस्थापितांकडून अन्याय होतो तिथे त्यांचा आवाज बनून त्यांना न्याय देण्याचे काम बंडखोरने केले आहे. संपादक गौतम भंडारे यांनी सुमित्रा पतसंस्थेतील भ्रष्टाचार बाहेर काढल्यामुळेच ती बंद पडली. गौतम भंडारे यांना दाबण्यासाठी प्रस्थापितांनी त्यांच्यावर कितीही केसेस दाखल केल्या तरी यापुढे कोर्टातील प्रत्येक लढाईला मी व माझी टीम नेहमी त्यांच्यासोबत असेल अशी मी यावेळी ग्वाही देतो.

बारामती झटका वेब पोर्टल व यु ट्युब चॅनेलचे संपादक श्रीनिवास कदम पाटील म्हणाले की, मी पण 17-18 वर्षे पत्रकारिता करतो. पत्रकारिता काय असते हे आम्ही सुद्धा अनुभवले आहे. कारण पत्रकारिता करीत असताना अनंत अडचणी येतात. पत्रकारिता करीत असताना घरावर तुळशीपत्र ठेवावे लागते, उदार व्हावे लागते. एकांगी बातमी असते ती बऱ्याच जणांना खटकते. त्यावेळी पत्रकारांना रोषाला सामोरे जावे लागते. ज्याच्या विरोधात बातमी असते म्हणजे वास्तवदर्शी बातमी लिहिलेली असते ती कुणालाच पटत नसते. सत्य हे पुढच्याला पटत नसते. तरी सुद्धा गौतम भंडारे यांनी या तालुक्यात अतिशय ताठपणे पत्रकारिता केलेली आहे. बंडखोर या नावाप्रमाणेच विचारांनी बंडखोर असणाऱ्या गौतम भंडारे यांचा मला अभिमान आहे. कधी सुद्धा प्रलोभनाला, दबावाला बळी न पडलेला हा माणूस आहे. मी पण कुणालाही न घाबरता व कुणाची तमा न बाळगता माझ्या बारामती झटका वेब पोर्टलवर दिसेल तेच छापतो. माझी सडेतोड पत्रकारिता पाहून गौतम भंडारे यांनी मला धुरंधर पत्रकार हा पुरस्कार देऊन लढा आम्ही सोबत आहे असेच म्हटले आहे. माझा हा पुरस्कार मी माझ्या आई वडिलांना समर्पित करतो.

उपजिल्हा रुग्णालय अकलूज येथील इन्चार्ज सिस्टर सुनिता भालेराव म्हणाल्या की, मी 2003 पासून अकलूज या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करीत असल्यामुळेच आज माझा एक मुलगा एमबीबीएस, तर दुसरा मुलगा इंजिनियर आहे. माझ्यासारख्या नर्सला आपण सिलेक्ट करून सन्मान केल्याबद्दल आपले आभार! आम्ही जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतो. उपजिल्हा रुग्णालयात यापुढेही आम्ही कुणाची गैरसोय होऊ नये यासाठी नेहमीच दक्ष राहू.

यावेळी धुरंधर वैद्यकीय पुरस्कार डॉ. एम. के. इनामदार यांना, धुरंधर परिचारिका पुरस्कार सौ. सुनिता दिगंबर भालेराव यांना, धुरंधर समाजरत्न पुरस्कार आरपीआय (आठवले) चे राज्य उपाध्यक्ष किरण (तात्या) विठ्ठल धाईंजे, जगन्नाथ शिंदे, सुनील बाजी साळवे, नाशिक (आबा) विठ्ठल सोनवणे, विनायक अंकुश सुर्वे, महेश केशव शिंदे, प्राचार्य गजानन ज्ञानेश्वर जवंजाळ यांना, धुरंधर कायदारत्न पुरस्कार ॲड. सुमित राजू सावंत यांना, धुरंधर शिक्षकरत्न पुरस्कार मुख्याध्यापक प्रविण वसंत लोंढे, डॉ. शशिकांत कुलकर्णी यांना, धुरंधर पत्रकार पुरस्कार ज्योती गायकवाड (लोंढे), श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील यांना, धुरंधर कीर्तनकार पुरस्कार ह. भ. प. मोहनानंद महाराज पुरंदावडेकर (ओवाळ) यांना धुरंधर कलाकार पुरस्कार उमेश शिंदे यांना प्रदान करण्यात आला.

सदरचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी संपादक गौतम भंडारे यांच्यासह उपसंपादक ज्योती गायकवाड, कार्यकारी संपादक राजरत्न गौतम भंडारे, बारामती झटकाचे संपादक श्रीनिवास कदम पाटील, वृत्तसंपादक प्रविण लोंढे, सारंग मोकाटे यांनी परिश्रम घेतले.

नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.

Related Articles

Back to top button