नातेपुते पोलिसांची मोठी कामगिरी; ४.५० लाखांची चोरी अवघ्या काही दिवसांत उघड

नातेपुते (बारामती झटका)
नातेपुते पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या एका गंभीर चोरीच्या गुन्ह्याचा तपास करत नातेपुते पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे मोठी कामगिरी केली आहे. या गुन्ह्यातील आरोपीला तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या सीमेवरून ताब्यात घेऊन चोरीला गेलेल्या रकमेपैकी ३,५०,००० रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
दि. ०५/०५/२०२६ रोजी फिर्यादी मंगेश मुकुंद दीक्षित हे मालोजीराजे बँक, नातेपुते येथून ४,५०,००० रुपये काढून आपल्या मोटरसायकलवरून पंढरपूर रोडने जात असताना, दोन अनोळखी इसमांनी त्यांना ‘तुमचे पैसे पडले आहेत’ अशी थाप मारून लक्ष विचलित केले आणि त्यांच्या मोटरसायकलला अडकवलेली पैशाची पिशवी चोरून नेली होती. याप्रकरणी नातेपुते पोलीस ठाणे गुरनं 185/2026 भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून नातेपुते पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. सपोनी विशाल वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राकेश लोहार व पोलिस अंमलदार रणजीत मदने यांनी सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली आणि संशयित आरोपींचा माग काढला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे, आरोपी अशोक मॉरिस (वय ३९ वर्षे, रा. एमएमडीए, माटूर, चेन्नई, तामिळनाडू) याला पोलिसांनी नेल्लोर (आंध्र प्रदेश) परिसरातून ताब्यात घेतले.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यास बीएनएसएस (BNSS) अंतर्गत नोटीस बजावण्यात आली. पोलिसांच्या सखोल चौकशीत आरोपीकडून चोरीतील ३,५०,००० रुपये रक्कम हस्तगत करण्यात यश आले आहे. या कारवाईमुळे नातेपुते परिसरात सक्रिय असलेल्या गुन्हेगारी टोळ्यांना मोठा चाप बसला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण श्री. अतुल कुलकर्णी सो, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. विजय कबाडे उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज श्री. संतोष वाळके यांचे मार्गदर्शनाखाली नातेपुते पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक श्री विशाल वायकर, पोसई सोनल मोरे सहा. पोलीस फौजदार देविदास धोत्रे पोलीस नाईक राकेश लोहार, पोलीस नाईक अमोल वाघमोडे, पोलीस अंमलदार / रणजीत मदने, पोलीस अंमलदार असलम शेख नातेपुते पोलीस ठाणे यांनी केली आहे.
नवनवीन बातम्या व ताज्या घडामोडी पाहण्याकरिता बारामती झटका, संपादक – श्रीनिवास कदम पाटील, ९८५०१०४९१४ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुपमध्ये समाविष्ट करावा.



