कृषिवार्ताताज्या बातम्यासामाजिक

माळशिरस तालुक्यात ओढे, नाले वाहू लागले असून बंधारे तुडुंब भरून वाहू लागले

मळोली (बारामती झटका)

ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, सप्टेंबर अखेरला समाधानकारक पाऊस पडत आहे. परतीचा पाऊस पडत राहिल्यास शेतकऱ्यांना रब्बी हंगाम तारेल, अशी आशा आहे. गणरायाला निरोप देताना पाऊस पडू लागल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. माळशिरस तालुक्यातील ओढे, नाले वाहू लागलेले आहेत तर, बंधारे तुडुंब भरून वाहू लागलेले आहेत.

यावर्षी जून महिन्यात अल्पसा पाऊस पडला होता. जुलै महिन्यात मात्र सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला होता. ऑगस्ट महिना कोरडा गेल्याने चिंता वाढली होती. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीच्या तीन-चार दिवसात अल्पसा पाऊस पडलेला. त्यानंतर २०-२२ दिवस गायब झाला होता. तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागात कमी अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. या तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे असलेल्या पिकांना टॉनिक प्रमाणे आधार मिळाला आहे. असाच पाऊस पडत राहिला तर, रब्बी पेरणीला पोषक ठरणार असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

काही तालुक्यातील काही गावात चांगल्या पावसाची नोंद झाली आहे‌, याचा फायदा किमान जनावरांच्या वैरणीचा दोन-तीन महिन्यांचा तरी प्रश्न निकाली निघण्याचा अंदाज आहे. बहुतांशी ठिकाणी मोठ्या पावसाची गरज आहे. तीन दिवसात पडलेल्या पावसामुळे ओढे वाहिले, नाले भरले. बंधाऱ्यासमोर पाणी साठले तर विहिरींच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

गणपती उत्सवानंतर घटस्थापना नवरात्री उत्सवाकडे लक्ष लागून राहिलेले असते. घटस्थापनेपूर्वी घरातील स्वच्छता, दैनंदिन वापरातील कपडे यांचीही स्वच्छता केली जाते, यासाठी पाण्याची आवश्यकता असते. सध्या ओढे, नाले वाहत असल्याने घटस्थापनेच्या पूर्व संध्येला पाण्याची उपलब्धता झालेली असल्याने नवरात्र उत्सवाची स्वच्छता मनासारखी होणार आहे. बळीराजाला पाण्याची खरी गरज असते, त्यासाठी वरूण राजाची कृपा व्हावी लागते. कमी जास्त प्रमाणात का असेना वरूण राजाने गणरायाच्या आगमनाच्या वेळी सुरुवात केलेली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाण्यावाचून पिके जळण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती, त्या ठिकाणची पिके डौलाने डुलत आहेत. अनेक ठिकाणी धरणामध्ये पाण्याचा ओघ वाढत आहे. भविष्यामध्ये पिण्याच्या व शेतीच्या पाण्याची चिंता मिटणार असल्याने बळीराजाच्या चेहऱ्यावर समाधान जाणवत आहे.

नवनवीन व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या बारामती झटका फेसबुक पेजला लाईक आणि शेअर जरूर करा. https://bit.ly/31IKDng

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button